नियोजन आयोगच मोडीत काढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी टीका केली. या निर्णयाची किंमत देशाला मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटवर चव्हाण यांनी ट्विट करून मोदींच्या निर्णयावर टीका केली.
नियोजन आयोग मोडीत काढण्याचा निर्णय अतिशय धोकादायक असून, वित्तीय विषय मुक्त अर्थव्यवस्थेच्या हवाली करणे चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. मोदी यांनी नियोजन आयोगाऐवजी अस्तित्त्वात येणारी नवी संस्था कशी असावी, असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता. त्यानंतर चव्हाण यांनी या निर्णयावर टीका करणारे ट्विट टाकले. स्वातंत्र्य दिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातही मोदी यांनी सहा दशके जुनी व्यवस्था मोडीत काढण्याचे आणि त्याऐवजी सुटसुटीत आणि सर्वांना न्याय देणारी संस्था सुरू करण्याचे सुतोवाच केले होते. त्यांनी देशवासियांकडूनही यासंदर्भातील कल्पना मागविल्या आहेत.