मुंबई : एका ३० वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बिहार येथून या मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात पीडित मुलगी वास्तव्यास असून ऑगस्ट २०२३ मध्ये ती परिसरातून अचानक गायब झाली होती. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक दिवस या मुलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. याचदरम्यान तिचे वडील काम करीत असलेल्या कारखान्यातील तरुण नरेश राय (३०) हाही त्याच दिवसांपासून कामावर आला नव्हता. पोलिसांनी त्याची माहिती मिळवली असता तो बिहारमध्ये असल्याचे समजले.

हेही वाचा – मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी

हेही वाचा – मुंबई : टेलिफोनच्या केबल चोरणाऱ्या आरोपींना अटक

आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र तो वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होता. त्यामुळे तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी वेषांतर करून दोन दिवस बिहारमधील माधवपुरा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. मुलीला याच परिसरातील एका घरात ठेवल्याचे आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.