नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या नावाखाली पुणे पोलिसांकडून देशभरातील डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांवर आणि मानव हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलांवर केलेली अटकेची कारवाई बोगस आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेवरील लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २०१३ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणासह इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. या संस्थेवरील चौकशीचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पोलिसांनी आता निरपराध पुरोगामी कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुरु केली आहे.

सरकारने आपली सहानुभूती गमावली असून डॅमेज कन्ट्रोल करण्यासाठी त्यांचे आता प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच हे लोक सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्दीष्टप्राप्तीसाठी अडथळा ठरतील असे वाटत असल्यानेच या लोकांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआयने दाभोलकर हत्याप्रकरणात नुकतीच सचिन अंदुरेला अटक केली आहे. अंदुरे हा सनानत संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. एटीएसनेही या प्रकरणी नालासोपारा, पुणे आणि जालना येथून पाच जणांना बॉम्ब बनवणे आणि शस्त्रे लपवल्याप्रकरणी अटक केली आहे.