मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता दीपेश भान यांचे शनिवारी सकाळी मेंदूतील रक्तस्रावाने निधन झाले. ४१ वर्षीय दीपेश भान यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि वडील असा परिवार आहे. अत्यंत सुदृढ आणि निव्र्यसनी असलेल्या दीपेशसारख्या तरुण कलाकाराच्या अकाली निधनामुळे त्यांचे मालिकेतील आणि दूरचित्रवाहिनीवरील सहकलाकार-मित्रपरिवार शोकमग्न आहे.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चित्रीकरण सुरू होते. ते आटपून दहिसर येथील  निवासस्थानी दीपेश परतले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी घरापासून जवळच असलेल्या मैदानात मित्रांबरोबर  क्रिकेट खेळत असतानाच त्यांच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि ते जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाले असल्याचे जाहीर करण्यात आले. दीपेश भान यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. गेल्या वर्षीच त्यांना मुलगाही झाला होता.  

दीपेश भान यांनी याआधी ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘मे आय कम इन मॅडम’, ‘एफआयआर’सारख्या विनोदी मालिकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांनी आमिर खान यांच्याबरोबर टी ट्वेंटी विश्वचषकाच्या जाहिरातीतही काम केले होते. तसेच ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती.