मुंबई : स्पर्धक अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला अभिनेता आणि ‘हाऊस अरेस्ट’ या शोचा सूत्रसंचालक एजाज खान याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही त्याच्या याचिकेची दखल घेऊन पोलिसांना त्याच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

गेल्याच आठवड्यात दिंडोशी सत्र न्यायालयाने एजाज याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. आरोपांचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता एजाजची कोठडी आवश्यक आहे, असे दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळताना नमूद केले होते. त्यामुळे, एजाज याने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठापुढे एजाज याच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, एकलपीठाने पोलिसांना उपरोक्त आदेश दिले. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा एजाजने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची मागणी करताना केला आहे.

दरम्यान, तक्रारदार तरूणीला आपण आधीच विवाहित असल्याचे माहीत होते. त्यामुळे आमच्यातील शरीरसंबंध हे परस्पर सहमतीने होते, असा दावाही एजाजने केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी एजाज याच्यातर्फे काही व्हॉट्स ॲप संदेश आणि ध्वनीफिती न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या. त्यात, तक्रारदार तरूणीने त्यांच्यातील संबंध परस्पर सहमतीने होते हे मान्य करताना तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचे म्हटले होते, असे एजाज याच्या वतीने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, याप्रकरणी दाखल प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) घटना घडल्याच्या विशिष्ट तारखा, ठिकाणे आणि परिस्थिती उघड केली आहे, त्यानुसार, एजाज याने केवळ लग्नाचेच नाही, तर तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला व्यावसायिक मदत आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यामुळे, तक्रारदार आणि एजाज यांच्यात संमतीने शरीरसंबंध होते एवढ्यापुरते या प्रकरणाकडे पाहता येणार नाही. शरीरसंबंधांसाठीची संमती फसवणूक करून किंवा तथ्यांचे चुकीचे वर्णन करून मिळवली गेल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे सत्र न्यायालयाने एजाज याला दिलासा नाकारताना नमूद केले होते.