scorecardresearch

अभिनेता सचिन जोशी, ओमकार समुहाशी संबंधित ४१० कोटींच्या मालमत्तेवर टांच

ओमकार समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात २७ जानेवारी, २०२१ रोजी ईडीने अटक केली होती.

your-money2
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) ओमकार ग्रुपचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा, कमल किशोर गुप्ता तसेच निर्माता व अभिनेता सचिन जोशी यांच्याशी संबंधित ४१० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टांच आणली आहे.

 टांच आणण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील ओमकार १९७३ या इमारतीतील टॉवर सी मधील सदनिका, सचिन जोशीशी संबंधित पुण्यातील ८० कोटी रुपयांची जमीन यांचा समावेश आहे. आरोपी सचिन जोशी हा गुटखा व्यावसायिक जे. एम. जोशी यांचा मुलगा आहे. मार्च २०२० मध्ये औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने याप्रकरणी पैशांच्या अवैध हस्तांतरणाचा (मनी लाँर्डंरग ) गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या तपासात पुढे सचिन जोशीने ८७ कोटींची रक्कम इतरत्र वळवण्यात ओमकार डेव्हलपर्सला मदत केल्याच निष्पन्न झाले होते, असा आरोप आहे. 

ओमकार समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात २७ जानेवारी, २०२१ रोजी ईडीने अटक केली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून ४१० कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीज्विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा गैरव्यवहार केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीज्विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ईडीने गेल्यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी मुंबईतील सुप्रसिद्ध विकासक ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली होती. ईडीने आपल्या कारवाईत शीव येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना र्बिंल्डग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकले होते.

सिनेमानिर्मिती आणि क्रीडासंघ

सचिन जोशी हा गुटखा किंग व जेएमजे ग्रुपचे मालक जगदीश जोशी यांचा मुलगा आहे.याशिवाय सचिन जोशीने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सिनेमांची निर्मिती केली आहे. सचिन जोशीने श्रीलंकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम खरेदी केली होती. अजान, मुंबई मिरर, जॅकपॉट, वीरप्पन, अमावस यासारख्या हिंदी सिनेमात काम केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor sachin joshi belonging to the omkar group on assets worth rs 410 crore akp