मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठीही काम करीत आहे. संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या सुयश टिळक याने ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वने, वन्यजीव, जैवविविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासह भारतातील विविध जंगलांची सफर केली जाणार आहे.

जंगल सफारी म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ट्रेकिंग, छायाचित्रण, वाघ व सिंह पाहणे या गोष्टी हमखास येतात. मात्र ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’ ही लोकांना जैवविविधतेबद्दल जागरूक करणारी एक चळवळ आहे. निसर्गातील अनेक गंमतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल अशा कार्यशाळा, निसर्गभेटी आणि कथाकथनाच्या माध्यमातून लोकांची निसर्गाशी असलेली जवळीक वाढविण्याचा आणि निसर्गसंवर्धनाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जंगल सफारीच्या माध्यमातून वाघ, सिंहांच्या पलीकडे जंगलातील विविध प्राणी, झाडे, पाने, फुले, पक्षी, कीटक, जलचरांबद्दलची माहिती आणि एकमेकांशी असलेल्या संबंध याबद्दल सांगितले जाणार आहे. तरी ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’च्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अभिनेता सुयश टिळक याने केले आहे.

‘आपल्याकडे अनेकदा पर्यावरण पर्यटन म्हणजेच ‘इको टुरिझम’च्या नावाखाली वाघ, सिंह आदी विशिष्ट प्राणी दाखवले जातात आणि उर्वरित जंगलाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जंगलातील विविध प्रजातींचे प्राणी, झाडे, पाने, फुले, पक्षी, कीटक, जलचरांबद्दलची माहिती आणि एकमेकांशी असलेले संबंध ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही शांत वातावरण अनुभवता येईल असे जंगल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा शहरांमधील अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या जंगलांची माहितीही या कार्यक्रमांत मिळेल. तसेच जंगल म्हटले की विविध प्राणी तसेच साप आपल्यावर हल्ला करू शकतात आदी विविध गैरसमज लोकांच्या मनात असतात, हे गैरसमजही दूर करणार असून ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’च्या माध्यमातून संपूर्ण भारतातील जंगलांची सफर करणार आहोत. तसेच मनोरंजनसृष्टीतील विविध कामे सांभाळूनच हा प्रवास सुरू राहणार आहे. अभिनय हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांची निसर्ग, पर्यावरण यांच्याशी असलेली नाळ तुटत चालली असून ती पुन्हा एकदा जोडण्याचा आणि नागरिकांना निसर्गाच्या जवळ नेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे’, असे अभिनेता सुयश टिळक याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.