मुंबई : एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाची २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात घेतलेल्या परीक्षेत आलेल्या चुकीच्या पर्यायांमुळे ५ मे रोजी घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी करण्यात आले. त्यानंतर एका दिवसांमध्ये २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकीचे आले होते. २७ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून झालेल्या या परीक्षेला २७ हजार ८३७ उमेदवार उपस्थित होते. पर्याय चुकीचे आलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची ५ मे रोजी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांना बुधवारी मेसेज, ईमेल, व्हॉट्सअॅप आणि समाजमाध्यमाद्वारे फेरपरीक्षेची सूचना दिल्या.

शुक्रवारी विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून त्यांच्या लॉगिन आयडीमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड केले, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे दिलीप सरदेसाई यांनी दिली.

७९ टक्के विद्यार्थ्यांकडून विधी अभ्यासक्रमाची परीक्षा

नीट परीक्षेमुळे ४ मे ऐवजी २ मे रोजी घेतलेल्या विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा तीन सत्रांमध्ये घेण्यात आली. राज्यात १२१ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेमध्ये ७९.०९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोंदणी केलेल्या ५७ हजार २९५ विद्यार्थ्यांपैकी ४५ हजार ३१५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत १४ हजार ६८० विद्यार्थी, दुसऱ्या सत्रात, म्हणजे दुपारी १२:३० ते २:३० या वेळेत १५ हजार २६९ आणि तिसऱ्या सत्रात म्हणजे संध्याकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत १५ हजार ३६६ विद्यार्थी उपस्थित होते.