scorecardresearch

“भाजपात काय बोलायचं हे सांगण्यासाठी काळी टोपी येते”, अद्वेय हिरेंचा खोचक टोला; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना…”

“मी बाहेर पडलोय, ४९ मतदासंघातील भाजपाचे…”

Advay Ahire
अद्वय अहिरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

भाजपात व्यक्तीस्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. आम्ही सभा घेतो, तेव्हा काय बोलायचं काय नाही, हे सांगण्यासाठी सकाळी ७ वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते. ती काळी टोपी जे सांगते, तेच आम्हाला बोलाव लागतं. आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं. मुख्यमंत्र्यांना पाहिलं असेल, ते कागद धरल्याशिवाय बोलत नाही, असा टोला भाजपातून शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केलेल्या अद्वेय हिरे यांनी लगावला.

अद्वेय हिरे यांनी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा अद्वेय हिरे म्हणाले की, “मी खूप वेळा पक्षांतर केलं ही टीका करण्यात येत आहे. पण, हा माझा नाईलाज आहे. कारण, माझा ज्याला विरोध आहे, तो माणूस पक्षांतर करतो म्हणून, मला पक्षांतर करावं लागतं. त्यांना स्थिर राहायला सांगा, मी शिवसेना सोडणार नाही. ते भाजपाच्या युतीतून बाहेर पडले, मी भाजपामध्ये गेलो. ते परत भाजपात आले मी काँग्रेसमध्ये गेलो. ते काँग्रेसमध्ये आले मी पुन्हा भाजपात गेलो. ते पुन्हा भाजपात आले, मी आता शिवसेनेत आलो. आता त्यांना इथे येऊ देऊ नका. मला कुठेही जायची गरज पडणार नाही,” असा अप्रत्यक्षपणे टोमणा दादा भुसे यांना अद्वय हिरे यांनी लगावला.

हेही वाचा : “कितीही खोके, सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना…”, शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरेंची भाजपावर टीका

“येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर…”

“कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आलं. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही,” असेही अद्वय हिरे म्हणाले.

हेही वाचा : संभाजीराजेंनी घेतली तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट; काय झाली चर्चा? जाणून घ्या

“४९ मतदासंघातील भाजपाचे नेते…”

“शिवसेना सोडून लोकं निघून जात असल्याचा गैरसमज आहे. गेलेल्या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे. मी बाहेर पडलोय, ४९ मतदासंघातील भाजपाचे नेते बाहेर पडण्यासाठी थांबले आहेत. तिथे त्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा अद्वय हिरे यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 19:36 IST
ताज्या बातम्या