मुंबई : हात धुताना अंगावर पाणी उडाल्यामुळे संतापलेल्या अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याने ३० वर्षांच्या तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना कुर्ला पश्चिम परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून हल्ला करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.

प्रदीपकुमार गोबनाथ प्रजापती (३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो कुर्ला पश्चिम परिसरातील गौरव इंडस्ट्रीयल इस्टेट येथील फूड डिलेव्हरी सेंटरमध्ये काम करतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील रहिवासी आहे. तो शुक्रवारी काम करीत असलेल्या फूड डिलेव्हरी सेंटरमध्ये हात धुत होता. त्यावेळी अन्नपदार्थ घरी पोहोचविणारा पुष्कर यादव जवळच उभा होता. त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे संतापलेला यादव आणि प्रजापतीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि यादवने प्रजापतीवर चाकूने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रजापतीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमा गंभीर असल्याने त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. केईएम रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश

प्रजापतीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याच्या पोटावर व हातावर गंभीर वार झाले आहेत. प्रजापती गंभीर जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. पुष्कर यादवने हल्ला केल्याचे त्याने जबाबात सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी प्रजापतीच्या तक्रारीवरून यादवविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रजापतीने हात धुतले आणि त्यानंतर हात झटकल्यामुळे आरोपी यादवच्या अंगावर पाणी उडाले. त्यावरून उभयतांमध्ये वाद झाला. त्यातून संपातलेल्या यादवने प्रजापतीवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.

हेही वाचा – राजकारण्यांचा आखडता हात, निवडणूक आचारसंहितेमुळे दिवाळी पहाटला अनुपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रजापती मूळचा उत्तर प्रदेशातील सखोली गावचा रहिवासी असून त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उपचारानंतर प्रजापतीचा सविस्तर जबाब नोंदवण्यात येणार असून याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.