मुंबई : लोकल चालवताना काही वेळा नकळतपणे सिग्नल नियम मोटरमनकडून मोडला जातो. सिग्नलच्यापुढे लोकल उभ्या केल्या जातात. अशा चुकांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसताना देखील मोटरमनला सेवेतून सक्तीने निवृत्तीच्या (सीआरएस) कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या कारवाईविरोधात सीएसएमटी, कल्याण, पनवेल येथील मोटरमन हाताला काळी पट्टी बांधून ‘सीआरएस’च्या कारवाईचा निषेध करणार आहेत.
हेही वाचा – “तुम्ही बाळासाहेब थोरातांना फोन करणार का?”, नाना पटोले म्हणाले, “आमचं त्यांच्याबरोबर…”
लोकलने लाखो मुंबईकरांचा प्रवास सुखकर, वेगात होण्यासाठी मोटरमन महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मोटरमनकडून नकळत घडणाऱ्या चुकांसाठी थेट कामावरून काढण्याची शिक्षा मिळते. त्यामुळे मोटरमन मानसिक तणावाखाली आहेत. सिग्नल तोडण्याच्या चुकीसाठी शिक्षा दिली जावी, मात्र ती किती कठोर असावी याचा विचार व्हावा. मोटरमनला सेवेतून निवृत्त केल्यानंतर त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या मोटरमनला कामावरून काढल्यास त्यांना इतरत्र काम मिळणे कठीण होते. गेल्या वर्षात ‘सीआरएस’ची चार मोटरमन आणि जानेवारी २०२३ मध्ये एका मोटरमनवर कारवाई करण्यात आली. ‘सीआरएस’मुळे अनेक मोटरमनने आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे ‘सीआरएस’ कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनासमोर मांडली जाणार आहे. सध्या एकदिवसीय काळी फिती बांधून निषेध व्यक्त करू. मागणी मान्य न झाल्यास तीव्र निषेध व्यक्त केला जाईल, असे सेंट्रल रेल्वे मोटरमन असोसिएशनकडून सांगण्यात आले.