‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आर वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधात रविवार काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. असे असले तरी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉईंट परिसरात पर्यावरणप्रेमींनी रविवारी ‘आरे वाचवा’ राज्य सरकाचा निषेध करीत आंदोलन केले. आंदोलनाचा हा आठवा आठवडा आहे.

हेही वाचा – ग्रॅन्ट रोडमध्ये सापडलेल्या जखमी मोराच्या पायावर शस्त्रक्रिया

राज्य सरकारने ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीत हलविण्याचा निर्णय घेतल्यापासून दर रविवारी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉईंट परिसरात ‘आरे संवर्धन गटा’कडून आंदोलन करण्यात येत आहे. येथे आजही आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात पर्यावरणप्रेमीही सहभागी होणार होते. मात्र आंदोलन होण्यापूर्वी पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने निघालेले पर्यावरणप्रेमींनी आपला मोर्चा आरेच्या दिशेने वळवला आणि आरे वसाहतीत जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शांततेच्या मार्गाने करण्यात येणारे ठाण्यातील आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दडपल्याचा आरोप करीत ‘आरे संवर्धन गटा’तील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

२४ ऑगस्ट रोजी सुनावणी

आरे कारशेडविरोधातील याचिकांवर १० ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ सूचीमध्ये तशी नोंद आहे. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमीचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.