मुंबई :भारतातील महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल कॅन्सर). २०२२ मध्ये देशात या आजाराचे सव्वा लाख नवीन रुग्ण आढळले, तर जवळपास ८० हजार महिलांचा मृत्यू या रोगामुळे झाला. या पार्श्वभूमीवर एम्स दिल्लीने विकसित केलेली नवीन एचपीव्ही डीएनए रक्त चाचणी ही एक आशादायक वैद्यकीय प्रगती ठरत आहे.

या चाचणीद्वारे रक्तातील एचपीव्ही विषाणूच्या डीएनए अंशांचे निदान करता येते. यामुळे कर्करोगाच्या उपचारांचा प्रतिसाद कसा आहे हे समजण्यास मदत होते, तसेच रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता लवकर कळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एक नॉन-इनव्हेसिव्ह, सुलभ आणि किफायतशीर चाचणी आहे, जी विशेषतः ग्रामीण आणि साधनसंपत्तीच्या अभावात असलेल्या भागात उपयोगी ठरू शकते.

अनेकदा कर्करोगाच्या उपचारांनंतर रुग्णाला वारंवार इमेजिंग तपासण्या जसे की सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्या कराव्या लागतात. ज्यामुळे आर्थिक आणि मानसिक तणाव वाढतो. सीटी एचपीव्ही- डिएनएचे प्रमाण थेट ट्यूमरच्या प्रमाणाशी संबंधित असल्याने, या चाचणीच्या माध्यमातून उपचारांचा प्रभाव कितपत आहे हे समजते. शिवाय, रोग पुन्हा उद्भवतोय का किंवा उपचार निष्फळ ठरत आहेत का हे वेळेत ओळखता येते. प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू ऑफ सर्क्युलेटिंग एचपीव्ही सेल-फ्री डीएनए इन सर्व्हिकल कॅन्सर युजिंग लिक्विड बायोप्सी” या नावाने करण्यात आलेल्या अभ्यासाचे नेतृत्व ‘एम्स’च्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मयंक सिंग यांनी केले. हा अभ्यास नॅचरल ग्रुपच्या साइंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या निष्कर्षांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निरीक्षणाच्या पद्धतीत मोठा बदल होऊ शकतो आणि भारतातील गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. डॉ. सिंग यांच्या मते, इतर कर्करोगांमध्ये एक रक्त चाचणी असते, जसे की ओवेरियन कर्करोगासाठी सीए-१२५ पण गर्भाशयाच्या कर्करोगासाठी अशी एक सोपी रक्त चाचणी नव्हती. ही रक्त चाचणी भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक सामान्य असलेल्या कर्करोगाशी लढण्यास एक मोठा बदल करू शकते,” असे ते म्हणाले. या नवीन चाचणीचा आधार लिक्विड बायोप्सीवर आहे, ज्यामध्ये रक्ताच्या नमुन्यातून सर्क्युलेटिंग ट्युमर डीएनए काढले जाते. या बाबतीत, संशोधकांनी एचपीव्ही डीएनएच्या तुकड्यांना, ज्यांना सर्क्युलेटिंग सेल-फ्री एचपीव्ही डीएनए म्हटले जाते, बायोमार्कर म्हणून लक्ष्य केले आहे.

“आम्ही ड्रॉपलेट डिजिटलपीसीआर वापरून ६० गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेतले, एकदा प्राथमिक स्थितीत आणि नंतर तीन महिन्यांच्या उपचारानंतर. यात आढळले की, उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या रुग्णांमध्ये एचपीव्ही डीएनएची पातळी लक्षणीयरीत्या घटली, त्यामुळे उपचाराच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी एक सोपी, नॉन-इन्व्हॅसिव्ह पद्धत उपलब्ध झाली,” असे डॉ. सिंग यांनी सांगितले. रुग्णांना उपचारादरम्यान आणि नंतर कर्करोगाच्या प्रगती किंवा पुनरागमनाची तपासणी करण्यासाठी अनेक चाचण्यांची आवश्यकता असते, जी महागडी आणि प्रवेश करण्यास कठीण असू शकतात. एम्सच्या नवीन रक्त चाचणीमुळे, अधिक स्वस्त आणि प्रवेशयोग्य पर्याय उपलब्ध होईल. “रक्तातील बायोमार्कर साधारणपणे स्कॅनवर गाठी दिसण्यापूर्वीच दिसून येतात. यामुळे पुनरागमन अधिक लवकर ओळखता येऊ शकते,” असे डॉ. सिंग म्हणाले. या चाचणीची किंमत सध्या सुमारे अडीच हजार रुपये आहे.

एम्सने केलेला प्राथमिक अभ्यास हा केवळ ६० रुग्णांवर आधारित होता, जो वैज्ञानिकदृष्ट्या खूपच लहान नमुना आहे. त्यामुळे त्याची अचूकता, संवेदनशीलता आणि दीर्घकालीन वापर यासंदर्भात अजून मोठ्या प्रमाणात अभ्यासांची गरज आहे ही बाब लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे निश्चित अनुमान काढण्याला काही मर्यादा असल्यामुळे त्याचा उपचारावर परिणाम होऊ शकतो असेही सूत्रांचे म्हणणे आहे. आणखी एक मर्यादा म्हणजे ही चाचणी फक्त एचपीव्हीशी संबंधित कर्करोगांकरिता उपयुक्त आहे, इतर प्रकारच्या गर्भाशयाच्या कर्करोगांमध्ये ती उपयोगी ठरणार नाही. गळ्याच्या कर्करोगासाठी अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या सीटीएचपीव्ही- डिएनए चाचण्या सध्या वैद्यकीय व्यवहारात रुजलेल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काटेकोरपणे तपासलेल्या आहेत. या तुलनेत एम्सने दिल्लीने विकसित केलेली एचपीव्ही डिएनए चाचणी अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे.

भारतात एम्सने विकसित केलेली चाचणी निश्चितच संशोधनाची आणि अंमलबजावणीची दिशा बदलणारी ठरू शकते. जर ती मोठ्या अभ्यासांद्वारे प्रमाणित झाली, तर ही चाचणी प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या दिशेने भारताचा एक मोठा पाऊल ठरू शकते. कर्करोग प्रतिबंधासाठी देशात विकसित झालेलं हे नवं तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय बदल घडवू शकते असे एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे संचालक व वैद्यकीय व प्रिसिजन ऑन्कोलॉजी डॉ. सेवंती लिमये यांनी सांगितले.