राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमनेही राज्यातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा एमआयएमने केली आहे. यात आमदार वारिस पठाण यांना पुन्हा भायखळ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे सत्ताधारी युती, आघाडीतील पक्षांसह इतर राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून, युतीचं जागावाटपाचं कोड अद्याप सुटलेलं नाही. त्यामुळे युती होणार की नाही, याविषयी वेगवेगळे तर्कविर्तक राजकीय वर्तुळात लावले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उदयाला आलेल्या एमआयएम-वंचित बहुजन आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुट पडली. सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याने एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

वेगळं लढण्याच्या निर्णयानंतर एमआयएमने राज्यातील ६० जागांची चाचपणी केली होती. त्यातील मुंबईतील जागांचाही समावेश होता. निवडणूक जाहीर होताच एमआयएमने मुंबईतील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून ही यादी जाहीर केली आहे. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना आनंद होत आहे,” असे म्हणत ओवेसी यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

आणखी वाचा : पुण्यात तृतीयपंथीही निवडणुकीच्या रिंगणात

कुर्ला विधानसभा मतदारसंघातून ज्ञानू डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहवाज सरफराज हुसेन शेख, भायखळ्यातून आमदार वारिस पठाण, तर अंधेरी पश्चिममधून अरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.