मुंबई : अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. केरळमधील कोची येथून आलेले एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरताना घसरले. विमानाचे तीन टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे विमानाचे इंजिन क्राऊलिंग, एका विंगचा फ्लॅप आणि नोज व्हील एरिया याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत प्रवासी थोडक्यात वाचले.
सोमवारी मुसळधार पावसात कोचीहून मुंबईला येणारे विमान ‘एआय २७४४’ लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. ही घटना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ९.२७ वाजता घडली. ‘एअरबस ए३२०’ विमान धावपट्टी २७ वर उतरताच नियंत्रण गमावले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते सुमारे १६ ते १७ मीटर कच्च्या जागेत घसरले. त्यानंतर, विमान टॅक्सीवे मार्गे पार्किंग स्टँडवर पोहोचले. या अपघातामुळे विमानाचे तीन टायर फुटले आणि इंजिन काऊलिंग, एका विंगचा फ्लॅप आणि नोज व्हील एरिया यांचे नुकसान झाले. या घटनेनंतर विमान सुरक्षितरित्या टर्मिनल गेटपर्यंत पोहचले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले.
मुसळधार पावसामुळे विमान घसरल्याची माहिती विमान प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दिली जात होती. परंतु, सूत्रांनी दिलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाच्या पंख आणि चाकाच्या भागावर गवत आणि चिखल अडकल्याचे दिसून आले. धावपट्टीवर किरकोळ नुकसान देखील झाले आहे. त्यानंतर प्रथम धावपट्टी ०९/२७ बंद केल्यानंतर दुसरी धावपट्टी १४/३२ कार्यान्वित करण्यात आली. एअर इंडिया आणि विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. परंतु या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
एअर इंडियाचे म्हणणे काय? सोमवारी कोचीहून मुंबईला जाणाऱ्या ‘एआय २७४४’ या विमानला लॅंडिग दरम्यान मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. धावपट्टीवर उतरताच विमान धावपट्टीवरून अयोग्यरित्या बाहेर पडले. मात्र, विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहचले आणि त्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स खाली उतरले. तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले. प्रवासी आणि सेवकांची सुरक्षा याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. विमानतळ प्रशासनाकडून तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद पथकांना बोलवण्यात आले.