मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त होण्याची नामुष्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढावली आहे. या निवडणुका लढवू नका, असे मी सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. पवार यांच्या रोखठोक खुलाशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनागोंदी उघड झाली आहे.
शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्रवारी नोएडा येथे गेले होते. त्यावेळी माध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. ‘बिहारच्या निवडणुकांची पक्षाची तयारी नव्हती. मला त्या निवडणुकांकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. या निवडणुका लढवू नये, असे मी स्पष्टपणे सांगतिले होते. बिहारच्या निवडणुकांची जबाबदारी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर देण्यात आली होती, असे पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने बिहारमध्ये १६ उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये महुआ, पिंप्रा आणि मनिहारी या तीन मतदारसंघातील उमेदवारांनी किमान हजार मताचा टप्पा ओलांडला. बाकी १३ उमेदवार २०० ते ९०० मतांच्या दरम्यान आहेत. राष्ट्रवादीला बिहारमध्ये अवघी ०.०३ टक्के मते मिळाली. विशेष म्हणजे‘नोटा’ला (कुणीही पसंत नाही) राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते (१.८२ टक्के) आहेत. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार किमान १/६ मते प्राप्त करु न शकल्याने सर्वांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.
राष्ट्रवादी महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे. बिहारमध्ये मात्र या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून गेलेला दर्जा प्राप्त करण्याचा यामागे प्रयत्न होता. मात्र या निवडणुकांसाठी पक्षाने महाराष्ट्रातून काही रसद पुरवली नाही. स्टार प्रचारक नेमले पण, राज्यातूनही एकही नेता प्रचाराला गेला नाही. एकसंध राष्ट्रवादी असताना पक्षाचा बिहारमध्ये आमदार आणि खासदारही होता.बिहारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी ब्रिजकुमार श्रीवास्तव यांनी पक्षाने उमेदवारांना कोणतीही मदत केली नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
मतदारसंघ, उमेदवार व मते
नौटन : जयप्रकाश २७०, मनिहारी : सैफअली खान ४८६५, पारस : बिपीन सिंह ७८६, महुआ : अखिलेश ठाकुर १०००, राघोपुरा : अनिल सिंह ९८३, सासाराम : आशुतोष सिंह ५६३, पिंप्रा : अमीत कुशवाह २०१४, सोनेपूर : धर्मवीर कुमार ४७१, बाखरी : विकास कुमार ६०९, अमरपूर : अनिल कुमार सिंह ३९५, पटनासाहीब : आदिल अफताब खान ९०२, मोहनिया : मन्नु कुमार ३१८, दिनारा : मनोजकुमार ७८१, नरकटियाजंग : मोहम्मद अझीम २९१अशी मते राष्ट्रवादी उमेदवारांना मिळाली आहेत.
