लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार व प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार असून पक्षाचे सभा, कार्यक्रम यांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्वत: अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट वापरण्यास सुरुवात केली आहे.

शरद पवार पक्षाध्यक्ष असताना पक्ष प्रसिद्धीचे काम ‘जॉइंनिंग माइंडस’ कंपनीकडे होते. पक्षाची फाटाफूट झाल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रसिद्धीची काम ‘अनोखी’ कंपनी पाहात होती. विधानसभेसाठी मोठ्या कंपनीच्या शोधात अजित पवार होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात पवार यांना ‘डीझाईन बॉक्स’ कंपनीने एक सादरीकरण दाखवले. नरेश आरोरा यांची ही कंपनी असून राजस्थान आणि कर्नाटकमध्ये या कंपनीने काँग्रेससाठी प्रचार अभियान राबवलेले आहे.

हेही वाचा >>>‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि तिरंगी झेंडा यात बदल होणार नाही. मात्र पक्षाचा अधिकृत रंग यापुढे गुलाबी असणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून पक्षाचे फलक, जाहिराती यावर गुलाबी रंगाला प्राधान्य देण्यात येत आहे. अजित पवार यापुढे पांढऱ्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. त्यासाठी डझनभर जॅकेट खास शिवून घेतली आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरतील. कंपनीच्या सूचनेप्रमाणे अजित पवार यांनी छातीवर घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह लावण्यास प्रारंभ केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीत तर्क

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणाच्या प्रचारार्थ अजित पवार राज्यभर दौरे करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पुढच्या आठवड्यात पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचारार्थ महिलांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महिलांना सर्व क्षेत्रांत प्राधान्य ठेवलेले आहे. त्या राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी महिलांचा आवडता गुलाबी रंग लाभदायक राहील, असाही राष्ट्रवादीत तर्क आहे.