राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचं पठण करण्याचं आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती तसेच आमदार रवी राणा हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आपल्याला पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप सध्या या दांपत्याकडून केला जात असला तरी पोलिसांनी हे दावे फेटाळून लावलेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या राणा दांपत्याबद्दल आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.

नक्की पाहा हे फोटो >> नवनीत राणा : मनोरंजन ते राजकारण… बोल्ड अभिनेत्री ते रोखठोक भूमिका मांडणाऱ्या नेत्या; वडील होते लष्करी अधिकारी तर आई…

राणा दांपत्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी, “२०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते,” असं सांगितलं. पुढे बोलताना, “२०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते, २०१९ ला नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिलेले नव्हते,” असं अजित पवार यांनी राणा दांपत्यासंदर्भात मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “ज्यांना आपण पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

राज ठाकरेंची भूमिका बदलल्याचाही टोला
“राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपावर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. “लोकसभेला मात्र त्यांचा (राज ठाकरेंचा) अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या,” याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येईल वाटलं नव्हतं…
“काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजपा एकत्र होते, आज ममतादीदी भाजपाच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजपासोबत असतात कधी भाजपाचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात,” असंही अजित पवारांनी उदाहरणांसहीत सांगितलं.