चर्चानाटय़ावर पडदा; अजितदादा यांना अश्रू अनावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या वयात त्यांना झालेला त्रास आणि होणारी बदनामी यामुळे उद्विग्न होऊनच मी आमदारकीचा राजीनामा दिला. पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही, साहेबांचाच शब्द अंतिम आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट करीत अजित पवार यांनी शनिवारी राजीनाम्याबाबत रंगलेल्या चर्चानाटय़ावर पडदा पाडला.

एरवी आक्रमक असलेले अजित पवार पत्रकार परिषदेत भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते. राज्य सहकारी बँकेत १,०८८ कोटींची अनियमितता झाल्याची माहिती सरकारच्या वतीने विधिमंडळात देण्यात आली होती. तरीही २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याची आवई उठविण्यात आली, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यापासून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क केले जात होते. ते कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शरद पवार यांच्या निवासस्थानी शनिवारी दुपारी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. या बैठकीनंतर सारे काही आलबेल असल्याचा निर्वाळा शरद पवार यांनी दिला. त्यानंतरच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. कोणालाही विश्वासात न घेता राजीनामा दिल्याबद्दल त्यांनी आधी दिलगिरी व्यक्त केली आणि शरद पवार जो आदेश देतील त्याचे पालन करीन, असेही स्पष्ट केले.

राज्य सहकारी बँकेत केवळ आपण एकटेच नव्हतो, तर भाजपचेही १७ संचालक होते. मात्र या प्रकरणात केवळ आपले नाव असल्यानेच निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण जाणूनबजून पेटविले जात आहे. त्यात शरद पवार यांचा काडीचाही सबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी २०१०-११ पासून सुरू असून त्यात अचानक पवारांचे नाव घुसवण्यात आले आहे. राज्य सरकारनेच या प्रकरणात घोटाळा नाही तर काही कर्जप्रकरणांत अनियमितता झाल्याचे सभागृहात स्पष्ट केले आहे. असे असतानाही केवळ राजकीय द्वेषातून आपल्याला नाहक बदनाम केले जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

आपण आधी राजकारणात आलो, नंतर सुप्रिया आली. अलीकडेच पार्थने राजकारणात प्रवेश केला. आता रोहित निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. अशा प्रत्येक टप्प्यावर कारण नसताना गृहकलहाचा मुद्दा उकरून काढून आमच्या परिवारात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पवार कुटुंबात शरद पवार हेच प्रमुख असून त्यांचाच शब्द अंतिम असल्याचे सांगताना कुटुंबात कसलाही वाद नसल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.

११ हजार कोटींच्या ठेवी, मग २५ हजार कोटींचा घोटाळा कसा?

राज्य सरकारी बँकेवर सर्वपक्षीयांची सत्ता होती. त्यावेळी केवळ राज्यातील साखर कारखाने, सूतगिरण्या चालाव्यात यासाठी सरकारच्या हमीवर कर्जे देण्यात आली. ती वसूलही झाली आहेत. सरकारनेच विधिमंडळात या प्रकरणात एक हजार ८८ कोटींची अनियमितता झाल्याचे सांगितले आहे. मुळातच ११ ते १२ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या आणि २८५ कोटींचा नफा झालेल्या या बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा, असा सवालही पवार यांनी केला.

भाजप नेत्यांना वेगळा न्याय का?

राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारे बुडीत कर्जे असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांशी संबंधित चार कारखान्यांना केवळ ते आपल्या पक्षातील आहेत म्हणून अर्थसंकल्पात तरतूद करून मदत केली आहे. तोटय़ातील कारखान्यांना भाजप सरकारने मदत केल्यामुळे सारे माफ का, असा सवालही अजित पवार यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar resigns due to sharad pawar in trouble abn
First published on: 29-09-2019 at 01:08 IST