पारा ४३.६ अंशांवर; जगभरातील पंधरा शहरांमध्ये भारतातील दहा ठिकाणे सर्वाधिक तापमान
गेले दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली आहे. अकोल्यातील कमाल ४३.६ अंश से. तापमान सोमवारी जगभरातील सर्वाधिक ठरले. एवढेच नव्हे तर जगातील सर्वाधिक तापमानांच्या १५ ठिकाणांमध्ये भारतातील दहा ठिकाणांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात घसरण होणार असली तरी त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मध्य प्रदेश व आजूबाजूच्या परिसरात उष्णतेची लाट सुरू आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४३.८ अंश से. तापमान नोंदले गेले. विदर्भ तसेच मराठवाडय़ातील इतर शहरांमध्येही ४२ ते ४३ अंश से. तापमान राहिले. सोमवारीही याचीच पुनरावृत्ती घडली. जगभरातील तापमानाची नोंद घेणाऱ्या अल डोराडो वेदरच्या संकेतस्थळावर सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत अकोल्याचा पहिला क्रमांक लागला. अकोल्यात ४३.६ अंश से. तापमान होते. निझामाबाद, अनंतपूरमध्येही एवढेच तापमान नोंदले गेले. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश तसेच उत्तरेतील इतर शहरांचा क्रमांक होता. पहिल्या पंधरा शहरांमध्ये भारतातील दहा शहरे होती. खारगोण, नाउगाँग, अदिलाबाद, झांसी, बुंदी, दामोह आणि कोटा या शहरांमधील तापमानही ४२ अंश से. पेक्षा अधिक होते. वायव्य दिशेने पुन्हा एकदा थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरू होणार असल्याने राजस्थान तसेच उत्तर भारतातील तापमानात मंगळवारनंतर घट होऊ शकेल. मराठवाडा ते केरळपर्यंत वातखंड (विंड डिसकन्टय़ुनिटी) स्थिती आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी तुरळक सरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेही तापमानात थोडा फरक पडेल. महाराष्ट्रातही कमाल तापमानात दोन ते तीन अंश से.ने घसरण होण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने नोंदवला आहे. ही घसरण अल्पकाळ राहणार असून त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तापमान वाढण्यास सुरुवात होईल.

मुंबईत कमाल तापमान ३२.९ अंश से.
महाराष्ट्र तापलेला असतानाच मुंबईतील तापमान अजूनही नियंत्रणात आहे. सोमवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३२.९ अंश से. तर कुलाबा येथे ३१.८ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर वातावरण ढगाळ होते. मंगळवारीही तापमानात फारसा फरक पडणार नाही.