मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, असे वर्णन केले जाते. अशा या मुंबईत काँग्रेसचा प्रभारी म्हणजे वेगळेच ‘वजन’. अशा या ‘उद्योगी’ प्रभारींच्या यादीत मोहन प्रकाश यांचाही समावेश झाला आहे. यातूनच मोहन प्रकाश यांना हटवा, अशी जाहीर मागणी करण्यापर्यंत पदाधिकाऱ्यांची मजल गेली.  
काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे प्रभारीपद मिळणे हे मोठे ‘मानाचे’ समजले जाते. आतापर्यंत एखाद्या सरचिटणीसाकडे ही जबाबदारी सोपविली जायची, पण मोहन प्रकाश हे सरचिटणीस नसले तरी त्यांच्याकडे राज्याचा पदभार सोपविण्यात आला. समाजवादी चळवळीत आयुष्य काढलेले मोहन प्रकाश हे धडपडे म्हणून ओळखले जातात, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल पक्षात तीव्र असंतोष पसरला आहे. त्यातूनच पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समक्ष त्यांना हटवा, अशी मागणी पुढे आली.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षात सलोखा राहणार नाही याची दिल्लीतून विशेष खबरदारी घेतली जाते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यावर मोहन प्रकाश यांनी प्रदेशाध्यक्षांची बाजू उचलून धरली. मोहन प्रकाश हे कोणाचे ऐकून घेत नाहीत किंवा माणिकराव ठाकरे यांच्या फारच आहारी गेल्याचे पक्षाचे मंत्री किंवा पदाधिकाऱ्यांकडून ऐकू येते. विलासराव देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी असताना तत्कालीन प्रभारी मोतीलाल व्होरा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते, पण व्होरा आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यातूनच आदिक यांची विकेट गेली. नंतरचे प्रभारी वायलर रवी यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष अशा तिन्ही महत्त्वाच्या पदांवर बदल करून साऱ्यांचीच नाराजी ओढावून घेतली.
माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेताच मुंबईत आलेल्या वायलर रवी यांना पोलीस संरक्षणात विमानतळावर जावे लागले होते. मार्गारेट अल्वा आणि प्रभा राव या प्रभारी-प्रदेशाध्यक्षांच्या जोडीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या विलासराव देशमुख यांची झोप पार उडविली होती. अर्थात विलासरावांसारखा मुरब्बी नेता त्यांना पुरून उरला. मार्गारेट अल्वा यांच्या ‘उद्योगां’बद्दल पक्षात बरीच चर्चा व्हायची. हेकेखोर स्वभाव असलेल्या अल्वा या साऱ्यांचाच पाणउतारा करायच्या. दोन वर्षांत फक्त दोनदा नेतृत्वबदलासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी हे मात्र वादापासून कटाक्षाने दूर राहात. अन्य प्रभारींप्रमाणे अ‍ॅण्टोनी यांनी कधीही दैनंदिन कामकाजात किंवा नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केला नव्हता.