ठाण्यातील मुंब्रा मतदारसंघात वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे आमदार व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी आता सर्वपक्षीय नेत्यांनी संधान साधले आहे. मुंब्य्रात आपला पक्ष रुजवू पाहत असलेल्या असरुद्दीन ओवेसी यांच्या मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाला छुपी साथ देण्याची रणनीती शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आखल्याचे समजते. शनिवारी दुपारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनीच एमआयएमच्या स्थानिक नेत्याला फूस लावल्याचे उघड होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी दुपारी मुंब्य्रात एका खासगी वृत्तवाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांना लक्ष्य करीत ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामध्ये आघाडीवर असलेले अश्रफ मुलाणी यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही नव्हते. मात्र, मुंब्य्रातील शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांच्या गाडीतून ते कार्यक्रमस्थळी आले आणि आव्हाडांवर टीकेचे आसूड ओढू लागले, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या गुप्तहेर विभागाला मिळाली आहे. भगत यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले. ‘येथील प्रश्न मांडण्यासाठी मुलाणी तेथे आले होते. त्यांचा कार्यक्रमस्थळी येण्याचा आणि माझा काहीही संबंध नाही,’ असे भगत म्हणाले. मुलाणी यांनीही हा दावा फेटाळून लावला आहे. यासंबंधी आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, ‘शनिवारी झालेल्या घटनेमागे कुणाचा हात आहे हे तुम्हीच तपासून पाहा’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सपाटून मार खात असताना आव्हाडांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीला सुमारे १२ हजारांचे मताधिक्य मिळाले. यात मुंब्य्रातील २७ हजार मताधिक्याचा वाटा मोठा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्याची व्यूहरचना त्यांच्या विरोधकांनी केली आहे. आव्हाड यांचे एके काळचे कट्टर समर्थक रौफ लाला यांच्यामार्फत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर आता मुलाणी यांनाही हाताशी धरण्यात आले आहे. काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अश्रफ मुलाणी यांनी नुकताच एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
आव्हाडांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले
ठाण्यातील मुंब्रा मतदारसंघात वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे आमदार व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी आता सर्वपक्षीय नेत्यांनी संधान साधले आहे.
First published on: 15-09-2014 at 01:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties come together to coil jitendra awhad in mumbra