scorecardresearch

सर्वपक्षीय जागर!; राज्यभर आज महाआरत्या, हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम

एरव्ही, राजकीय नेत्यांना हनुमान जयंतीचे फारसे अप्रूप नसते. यंदा मात्र जवळपास सर्वच पक्षांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून राजकीय कुरघोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत़.

मुंबई : एरव्ही, राजकीय नेत्यांना हनुमान जयंतीचे फारसे अप्रूप नसते. यंदा मात्र जवळपास सर्वच पक्षांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून राजकीय कुरघोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत़. मशिदींवरील भोंगे हटविले नाही, तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात दिला होता़  आज हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे हे पुण्यात सदाशिव पेठेतील खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तिथे हनुमान चालिसाचे पठणही केले जाणार आहे.

पुण्यात मनसेकडून होणाऱ्या महाआरतीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोजा इफ्तार कार्यक्रमाने प्रत्युत्तर दिले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दुधाने लॉन्स येथील हनुमान मंदिरात सायंकाळी सात वाजता रोजा इफ्तारचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांकडून हनुमान जयंतीनिमित्त आरती तर हिंदू बांधवांकडून रोजा इफ्तार आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे समोरासमोर आले आहेत.

मनसेने हिंदुत्वाचा आक्रमपणे पुरस्कार सुरू केल्याने शिवसेनेला मागे राहणे शक्यच नव्हते. मनसेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने दादरमध्ये महाआरतीचे आयोजन केले आहे. दादरमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी उभारलेल्या मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती, मारुती स्तोत्र पठणाचा कार्यक्रम शिवसेनेने आयोजित केला आहे. दादरमधील गोल देऊळात महाआरती होणार आहे. हे देऊळ उभारण्यात प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान होते. त्यामुळे महाआरतीसाठी या देवळाची निवड करत शिवसेनेने प्रबोधनकार व बाळासाहेबांचा वारसा आमच्याकडेच असल्याचा राजकीय संदेश देत मनसेवर कुरघोडी केली आहे.

शिवसेनेतर्फे आम्ही दरवर्षी हनुमान जयंती साजरी करत असतो. दादरच्या मंदिरात सायंकाळी ६ वाजता आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होईल, अशी माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. शिवसेना दरवर्षी विविध शाखांमध्ये, व्यायामशाळांमध्ये हनुमान जयंती साजरी करते. काही लोकांना नव्याने हनुमानाबद्दल आस्था वाटू लागली असली तरी शिवसेना दरवर्षीच हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करते, असा टोला शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मनसेला नाव न घेता लगावला.

निवडणुका आल्या की मनसेला जाग येते. मनसेने आपले इंजिन भाजपला चालवायला दिले आहे, हे त्यांच्या दोन सभांमधून स्पष्ट झाले. त्यांच्या या बेगडी हिंदुत्वाला मतदार भुलणार नाहीत, अशी टीका शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली. दुसरीकडे, हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी अमरावतीत मिरवणूक काढण्यात आली. येथील राजकमल चौकात महाआरतीचेही आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत चित्ररथ सहभागी झाले होते. रामनवमीच्या दिवशी विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते, त्याला उत्तर म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आल्याचे बोलले जाते.

दरम्यान, हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा पुढल्या काळात मी आणि खासदार नवनीत राणा मातोश्रीह्णवर हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी दिला. ज्या हनुमान मंदिरांमध्ये भोंगे नाहीत, त्या सर्व मंदिरांना भोंग्यांचे वाटप केले जाणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे. राणा यांनी दादरमध्ये येऊन हनुमान चालिसाचे पठण करावेच, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी दिल़े

कार्यक्रम असे..

  • पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती़  हनुमान चालिसाचेही पठण.
  • पुण्यातच दुधाने लॉन्स येथील हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचा रोजा इफ्तारचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांकडून हनुमान जयंतीनिमित्त आरती तर हिंदू बांधवांकडून रोजा इफ्तार.
  • दादरमध्ये गोल देवळात शिवसेनेकडून महाआरती, मारुती स्तोत्र पठणाचा कार्यक्रम.
  • अमरावतीत युवक काँग्रेसच्या वतीने मिरवणूक. महाआरतीचेही आयोजन.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All party hanuman jagar statewide maha aartya hanuman chalisa recitation programs ysh