सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला सर्वपक्षीय विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांचा कचरा येत्या २ ऑक्टोबरपासून न उचलण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून सोमवारी पालिकेच्या सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. प्रशासनाने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी सभागृहात आकांडतांडव केला, तर सत्ताधारी शिवसेनेने ‘हा कचरा आयुक्तांच्या घरासमोर टाकण्यात येईल’ असा इशारा देत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता कचरा उचलण्याबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत.

कचराभूमींमध्ये जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीने दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांनी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च लावावी, त्यासाठी सोसायटीच्या आवारात यंत्रणा उभी करावी, २ ऑक्टोबरपासून या सोसायटय़ांमधील केवळ सुका कचरा उचलण्यात येईल, असे पालिकेने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा फतवा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. ‘‘मुंबईमधील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे; परंतु प्रशासन या कर्तव्यापासून पळ काढत आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेताना मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनाही विश्वासात घेण्यात आलेले नाही. प्रशासनाची ही भूमिका आक्षेपार्ह आहे,’’ अशी टीका रवी राजा यांनी केली.

प्रशासनाच्या या निर्णयाचा समाचार घेताना भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले की, मुलुंडमधील ४० सोसायटय़ांनी ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यास सुरुवात केली; परंतु पालिकेकडे ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची यंत्रणाच नाही. कचराभूमीत एकाच ठिकाणी ओला आणि सुका कचरा टाकला जात आहे; पण मुंबईकरांवर मात्र ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती करण्यात येत आहे. पालिकेने २ ऑक्टोबर रोजी मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांचा कचरा उचलला नाही, तर तो पालिका कार्यालयांसमोर टाकला जाईल, असा इशारा मनोज कोटक यांनी दिला.

पालिका प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केला, तर उद्या रुग्णालये, शाळा बंद करण्याची घोषणा करण्यात येईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिला.

महापौरांसह २२७ नगरसेवकांना अंधारात ठेवून प्रशासन असे निर्णय घेत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. कचरा न उचलण्याचा निर्णय आयुक्तांनी तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा त्यांच्या घरासमोर कचरा टाकण्यात येईल, असा इशारा देत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सभागृहाची बैठक तहकूब करण्याची मागणी केली. महापौरांनी ही मागणी मान्य करीत बैठक तहकूब केली.

भाजप-काँग्रेसचा सभात्याग

कचरा न उचलण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या मागणीवर केवळ काही मोजक्याच नगरसेवकांना चर्चा करण्यास महापौरांनी संधी दिली. भाजप आणि काँग्रेसचे काही नगरसेवक बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे वारंवार करीत होते; परंतु महापौरांनी त्याकडे लक्ष न दिल्याने  भाजपसह काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All party opposed bmc decision over stop collecting garbage from housing societies
First published on: 19-09-2017 at 03:25 IST