राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी १९८५ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले असून ३२५० कोटींचा विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी येथे दिली.
५३वा महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. ग्रामविकास उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी राज्याला पंचायत बळकटीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत अडीच कोटींचे पारितोषिक मिळाले आहे ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात औषधे परवाना नोंदणी व औषधे नमुना विश्लेषण अहवाल ऑनलाईन करण्यात आल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनास सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ई-मोजणी, ई-चावडी, ई- जिल्हा, बारकोड पध्दत विकसित झाल्यामुळे महसूल प्रशासनात गती आली आहे.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, महापौर सुनील प्रभू, आमदार दिवाकर रावते, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, अतिरिक्त मुख्य सचिव अजित कुमार जैन, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, राजशिष्टाचार अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.