मुंबई : महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागातील अंबोली (अंधेरी) हिंदू स्मशानभूमीच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्या संबंधित कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे स्मशानभूमीतील लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेली दफनभूमीची सुविधा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत नागरिकांसाठी अन्य ठिकाणी दफनभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या इमारत परिरक्षण विभागामार्फत अंबोली स्मशानभूमीचे अद्ययावतीकरण तसेच पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. स्मशानभूमीतील संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर तेथील लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी दफनभूमीची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, ओशिवरा हिंदू स्मशानभूमी आणि ढाके वसाहत हिंदू स्मशानभूमी येथे दफनभूमीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.