भाजपाने आपल्या ३८ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. राज्यभरातील भाजपाचे लाखो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत. गुरुवारी भाजपा अध्यक्ष अमित शाह मुंबई विमानतळावर पोहोताच त्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. बाईकवरुन आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत महानायक अमिताभ बच्चनही अडकले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन काल सायंकाळी फिल्मसिटीतून चित्रिकरण आवरून घरी जाण्यास निघाले. मात्र वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कोंडीचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागला. ‘फिल्मसिटी ते घर असं अंतर अर्ध्या तासाचं आहे मात्र आज हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच तास लागले.’ असं ट्विट बच्चन यांनी केलं. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे असे हजारो मुंबईकर होते ज्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करवा लागला. काहींना नियोजित वेळेत विमानतळापर्यंत पोहोचता आले नाही त्यामुळे त्यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.

तर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनी वांद्रे टर्मिन्सहून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या भाजपाच्या बसेस रोखून धरल्या होत्या. वांद्रयामध्ये तासाभरापासून प्रवासी बस स्टॉपवर थांबून आहेत, कामावर पोहोचायाल उशीर होत आहे अशा अनेक तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांनी माध्यमांकडे बोलून दाखवत आपला संताप व्यक्त केला आहे. या स्थितीसाठी भाजपाच्या महामेळावा कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.