टाळेबंदीच्या काळात येस बँक, एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंना महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना सरकारने केवळ ‘समज’ दिली असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

या प्रकरणात भविष्यात काही कायदेशीर पेच निर्माण झाल्यास त्यास जबाबदार धरण्याचा इशाराही गुप्ता यांना देण्यात आल्याचे समजते.

टाळेबंदीचे नियम मोडत गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी ८ एप्रिल रोजी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. या प्रकरणी राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता. कोणाच्या शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीदही देण्यात आली. पण कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही.