राज्यात सध्या थोरले व धाकटे पवार अर्थात काका शरद पवार व पुतणे अजित पवार यांच्या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या महिन्याच्या २ तारखेला अजित पवारांनी बंडखोरी करत आपला गट सत्तेत सहभागी करून घेतला. त्यांनी स्वत: उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार गटानं शरद पवार व त्यांच्या गटावर अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र, आता या दोघांनी गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा रंगत असून त्यावर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक भाष्य केलं आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी शरद पवार व अजित पवार यांची उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर गुप्त भेट झाल्याची चर्चा सध्या चालू आहे. अजित पवारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिल्याचं बोललं जात आहे. ही भेट जयंत पाटील यांनी आयोजित केल्याचीही चर्चा आहे. भेट नक्की झाली की नाही, याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया येत नसताना जर भेट झाली असेल, तर काय? या आधारे राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी “जयंत पाटील जर सरकारमध्ये आले, तर शरद पवारही आले असं म्हणता येईल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब शरीफ व नरेंद्र मोदी भेटू शकतात, तर शरद पवार व अजित पवार का नाही?” असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी केला आहे. तसेच, शरद पवार दोन दिवसांत यावर अधिकृत भूमिका मांडतील, असंही संजय राऊतांनी रविवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

भेट झाल्याची माहिती नाही – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, अशी कोणतीही भेट अजित पवार व शरद पवार यांच्यात झाल्याची आपल्याला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी “अशा प्रकारे संभ्रम निर्माण होणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. नाना पटोलेंनी मात्र शरद पवार मविआबरोबरच असल्याचा विश्वास व्यक्त केला.

“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हेच युती तुटण्याचं कारण”, संजय राऊतांचा मोठा दावा!

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भारती लव्हेकर यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीव्ही ९ शी बोलताना भेटी-गाठींच्या चर्चांवर सूचक विधान केलं. “एवढ्यात मला कल्पना नाही की गुपचूप कोण भेटतंय. पण भेटणं कधीही चांगलं. तुम्ही गुपचूप भेटा किंवा सर्वांसमोर भेटा. प्रेमाने भेटा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि भेटत राहा”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीवेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस गुप्तपणे कसे भेटत होते, यासंदर्भात अमृता फडणवीसांनी केलेल्या काही विधानांची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकांमध्ये काय होणार?

दरम्यान, राज्यातील राजकीय भवितव्याबाबत विचारणा केली असता भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या. “मला वाटतं भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यांच्याबरोबर ज्यांनी युती केली, तेही पहिल्या क्रमांकाचे ठरतील. विरोधक फक्त विरोध करतील”, असं त्या म्हणाल्या.