‘जी -२०’ कार्यगटाचे मुंबईत बैठकसत्र   

मुंबई : ‘जी -२०’ शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय दिशा निश्चित करण्याची संधी भारताला मिळाली आहे, असे देशाचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सोमवारी सांगितले. जग मंदीच्या उंबरठय़ावर असताना सद्यस्थितीत वित्तीय क्षेत्रात सुधारणा करण्याची ताकद भारताकडेच असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जी -२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यावर मंगळवारपासून मुंबईत चार दिवसांची पहिली विकास कार्यगटाची बैठक सुरू होत आहे. या परिषदेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना अमिताभ कांत यांनी परिषदेतील भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताच्या अध्यक्षपदाच्या एक वर्षांच्या कार्यकाळात देशातील ५६ शहरांमध्ये एकूण २१५ बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या बैठका होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि शहरातील ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीला बैठकांच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल. विविध अभ्यास गटांकडून केल्या जाणाऱ्या शिफारशींचा जागतिक पातळीवरील अर्थ -राजकीय सुधारणांसाठी वापर केला जाईल.

जागतिक पातळीवर मंदीचे सावट असताना भारताच्या अर्थव्यवस्थेला रुपेरी झळाळी लाभली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वासही कांत यांनी व्यक्त केला. जी – २० परिषदेच्या सदस्य राष्ट्रांच्या मदतीने जागतिक बहुस्तरीय वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या वित्त पुरवठा अधिक सुलभ होण्यावर भर देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वित्त पुरवठा झाल्यास त्याची फळे मिळू शकतात, असे मतही त्यांनी मांडले. 

 भारताचा प्राधान्यक्रम

डिजिटल क्षेत्रात वापर वाढण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा आणि तांत्रिक सुधारणा, महिला नेतृत्वप्रणित विकास, अन्न, इंधन आणि खते या क्षेत्रांच्या विकासाकरिता २१व्या शतकात बहुस्तरीय वित्तीय संस्थांच्या योगदानात वाढ, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात विकास, हरित इंधन, शाश्वत आणि चिरस्थायी विकास यांना भारताचे जी – २० शिखर परिषदेत प्राधान्य असल्याचेही कांत यांनी स्पष्ट केले. विकसनशील राष्ट्रे, लॅटिन अमेरिकन किंवा अशियातील विकसनशील राष्ट्रे आणि विकसित राष्ट्रे यांच्यात योग्य समन्वय साधला गेल्यास सर्वच स्तरांवरील राष्ट्रांना त्याचा फायदा होईल, अशी भारताची ठाम भूमिका आहे. त्याकरिता भारताकडून आवश्यक अशी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.  गेल्या आठ वर्षांत भारताने ४० कोटी नवीन बँक खाती उघडली. तसेच डिजिटल स्वरुपात वाढती उलाढाल, ३६ कोटींपेक्षा अधिक एलईडी दिव्यांचे वाटप,  तीन कोटी परवडणारी घरे बांधली गेली आहेत. जागतिक पातळीवर भारताचे हे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धर्तीवर ‘जी -२०’च्या सदस्य राष्ट्रांच्या मदतीने बहुस्तरीत वित्तीय संस्था उभारण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही कांत यांनी सांगितले. जी -२० राष्ट्रांच्या कार्यगटांच्या यादीत भारताच्या पुढाकाराने स्टार्टअप – २० हा नवीन कार्यगट स्थापन झाला आहे. जागतिक पातळीवर विकासात स्टार्टअप उद्योग हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. विकासाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर निश्चित करण्यात आलेले काही निकष भारताने मुदतीपूर्वीच पूर्ण केले. देशाला विकासाच्या क्षेत्रात झेप गाठण्यासाठी ५० वर्षे लागली होती. पण, आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविल्यावर काही क्षेत्रांत जे ५०वर्षांत जमले नाही ते सात-आठ वर्षांत पूर्ण  केले, असा दावाही त्यांनी केला. आर्थिक क्षेत्रात जागतिक पातळीवर बरेच उलटपालट होत असताना भारताने मात्र विकासाच्या क्षेत्रात चांगली झेप घेतली. जागतिक बँक व विविध वित्तीय यंत्रणांनी त्यावर शिक्कोमोर्तब केल्याकडेही कांत यांनी लक्ष वेधले.

मुंबई सजली

‘जी-२०’ राष्ट्रांच्या कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र सजावट तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ संकुलात होणाऱ्या या कार्यगटाच्या बैठकीला ४३ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विमानतळापासून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतच्या रस्त्यावर शिखर परिषदेचे मोठे फलक झळकत आहेत.