भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीकरिता ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर आचारसंहिता लागू झालेली आहे. या पार्श्वभूमवर आज महाविकास आघाडीने पत्रकारपरिषद घेतली आणि ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय गुरुवारी (१३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल अशी देखील माहिती देण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हणाले “आजची पत्रकारपरिषद घेण्याचं कारण म्हणजे रमेश लटके यांच्या निधनानंतर जी जाग रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. ही पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी तर्फे लढवण्यात येईल. म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीचे तीनही पदाधिकारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, या विभागाचा विभागप्रमुख म्हणून मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राखी जाधव असे आम्ही तीनजण आपल्या समोर आलेलो आहोत.”

हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू

याशिवाय “आजच सकाळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस नेते अमित देशमुख या सगळ्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला. याशिवाय राष्ट्रवी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. म्हणून ३ नोव्हेंबर रोजी होणारी ही पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीच्यावतीने लढली जाणार आहे.” अशी माहिती परब यांनी यावेळी दिली.

तर “१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे यावेळी येतील.” असंही परब यावेळी म्हणाले.