मुंबई : घरफोडी करणाऱ्या टोळीतील चार सराईत चोरांना अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. या टोळीने चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८ लाख लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीविरोधात विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अंधेरीतील आनंदवन इमारतीत राहणाऱ्या विवेक उपाध्याय यांच्या घरात ८ जुलै रोजी चोरी झाली होती. चोरांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने या चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात तीन अनोळखी इसम रेनकोट घालून इमारतीत शिरून चोरी करीत असल्याचे आढळले होते.
दिवसा रेकी… रात्री घरफोडी…
प्राथमिक तपासात या चोरीमागे गुजरातहून मुंबईत येणाऱ्या टोळीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ही टोळी ठराविक पद्धतीने बंद घरे हेरून त्यामध्ये घरफोडी करीत होती. दिवसा बंद घरांची रेकी केली जायची आणि रात्री तिथे चोरी करायची अशी त्यांची पद्धत होती. चोरीचा ऐवज मुंबईतच एका इसमाला विकण्यात येत होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारेया गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. त्यानंतर गुजरातमधील वडोदरा येथून निझामुद्दीन शेख (३५), मोहम्मद शकील शेख (४५), अब्दुल मन्सुरी (३२) आणि इस्माईल हबीब (५०) या चौघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून १०० ग्रॅम सोने आणि एक किलो चांदीचे दागिने असा साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ७ दिवसांत पोलिसांनी या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले.
या पथकाने केली कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक समाधान सुपे, गुन्हे प्रकरटीकरण शाखेतील मारोती सुरनर, प्रवीण कांबळे, भास्कर गायकवाड, मनेष कांबरी, विनायक गवळी, वसंत नरबट, दत्ता टरके, हरी शिंदे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणात विविध टोळ्या सक्रिय आहेत. सर्वाधिक घरफोडी रात्रीच्या वेळी होतात. बंद घरांची रेकी करून या टोळ्या घरफोडी करतात.
वाढत्या घरफोडीच्या घटना
मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या घरफोडीच्या घटना पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. मुंबईत २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरफोडीच्या एकूण गुन्ह्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढती घरफोडी आणि चोरीचे गुन्हे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. दुसरीकडे २०२४ मध्ये झालेल्या घरफोडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी ५२ प्रकरणांची उकल झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. घरांना लोखंडी जाळी किंवा ग्रिल्स लावावे, खिडक्यांना अलार्म सेन्सर बसवावे, सीसी टीव्ही कॅमेरे बसवून घरात नसताना त्याचे मोबाइलमध्ये निरीक्षण करावे आदी उपाय पोलिसांनी सुचवले आहेत.