मुंबई: चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची गेल्या अनेक वर्षांपासून दूरवस्था झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त रहिवाशांनी बुधवारी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता. दाट लोकवस्ती असलेल्या खारदेव नगरात अरविंद वाडी, नागेश पाटील वाडी आणि किसन कांबळे मार्ग आदी परिसराचा समावेश आहे.

येथे पालिकेचे एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शौचालयाची दूरवस्था झाली आहे. या शौचालयात वीज आणि पाण्याची सोय नाही. शिवाय येथील पत्रे तुटले आहेत. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अपुरी आसल्याने अनेक रहिवाशांना दूरवर असलेल्या शौचालयात जावे लागते. याबाबत स्थानिकांनी अनेकदा पालिकेच्या एम – पश्चिम विभाग कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिका अधिकारी या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असल्याने संतप्त रहिवाशांनी बुधवारी सामाजिक कार्येकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या एम – पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता.