माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुली संदर्भात आरोप केल्यानंतर देशमुखविरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी ट्विट करत त्यांची बाजू मांडली असून या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

“मला ईडीने समन्स बजावल्यानंतर मी ईडीला तपासात सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल,” असं देशमुख म्हणाले.

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत. ते भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेलीये. परमबीर सिंगांवर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझेने परमबीर सिंगच्या सांगण्यवारून माझ्यावर आरोप केलेत. याआधी तो तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले. त्यामुळे अशा लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होतायत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, याचं मला दुःख आहे. मी नैतिकतेला धरून चालणारा माणूस आहे. गेल्या ३० वर्षात माझ्यावर एकही आरोप झालेला नाही. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहे,” असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.