अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!; पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

ईडी कडून काल दिवसभर अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आली होती.

anil deshmukh news, personal secretary, Enforcement Directorate,
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता.(संग्रहीत छायाचित्र)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज (शनिवार) त्यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. काल दिवसभर अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतली.

काळा पैसा आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकास(पीए) ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलंआहे. ”वाझे वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीने अटक केली. मला खात्री आहे पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल.c असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.

परमबीर सिंग आयुक्तपदी असताना गप्प का होते?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आयुक्तपदी असताना ते गप्प का होते, असा सवाल करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil deshmukhs difficulty increases pa sanjeev palande and kundan shinde arrested msr