बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी ‘डिस्ने’, ‘सोनी पिक्चर्स’ यांच्यात चढाओढ
हॉलीवूड अॅनिमेशनपटांच्या फ्रँचाईझींना भारतात कायम चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ‘आइस एज’, ‘कार्स’, ‘मादागास्कर’, ‘टॉय स्टोरी’, ‘स्मर्फ’सारख्या अॅनिमेशनपटांच्या सिक्वल्ससाठी याआधीही भारतीय बाजारपेठ महत्त्वाची ठरली आहे. हॉलीवूडच्या अॅनिमेशनपटांचा प्रेक्षकवर्ग हा पहिल्यांदा लहान मुलांपुरताच मर्यादित होता, मात्र त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ‘कुटुंब रंगले अॅनिमेशनपटात’ अशी स्थिती आपल्याक डे निर्माण झाली आहे. त्याची परिणती अॅनिमेनशपटांच्या तिकीटबारीवरील आर्थिक यशात झाली असून या वाढत्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी ‘डिस्ने’, ‘सोनी पिक्चर्स’, ‘वॉर्नर ब्रदर्स’सारख्या अॅनिमेशन क्षेत्रातील दादा स्टुडिओजनी कंबर कसली आहे. या वर्षी कमीत कमी १० ते १३ अॅनिमेशनपट भारतात प्रदर्शित होणार आहेत.
या वर्षांची सुरुवातच डिस्नेच्या ‘झुटोपिया’ या अॅनिमेशनपटाने झाली होती. या पहिल्याच अॅनिमेशनपटाने चांगला व्यवसाय केला. पाठोपाठ ‘कुंग फु पांडा ३’, ‘अँग्री बर्ड्स’, ‘फाइंडिंग डोरी’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आणि या प्रत्येक चित्रपटाने तिकीटबारीवर कोटींच्या घरात व्यवसाय केला आहे. इंग्रजी चित्रपटांकडे पाहण्याचा आपल्या प्रेक्षकांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदललेला आहे. अॅनिमेशनपटांपासून लाइव्ह अॅक्शनपटांसारखे वेगळे प्रयोग असलेल्या चित्रपटांनाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘द जंगलबुक’ या लाइव्ह अॅक्शनपटाने १८२ कोटी रुपयांचा व्यवसाय करून विक्रम नोंदवला. यावरून उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या अॅनिमेशनपटांसाठी इथले प्रेक्षक आतुर आहेत, हे दिसून आले असल्याचे ‘डिस्ने इंडिया’च्या उपाध्यक्ष अमृता पांडे यांनी सांगितले. या अॅनिमेशनपटांची मांडणी, पात्रांची रचना अशी असते की, त्यांच्याशी प्रेक्षकांचे नाते तयार होते, त्यामुळेच त्यांच्या मनावर या चित्रपटांची जादू कायम राहते. आणि त्याच प्रेमापोटी पुढचे भाग पाहिले जातात, असे मत अभिनेता अर्जुन कपूरने व्यक्त केले. पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘आइस एज’ मालिकेतील पाचव्या सिक्वलसाठी अर्जुनने आवाज दिला आहे.
बॉलीवूडच्या कलाकारांनी या आधीही अॅनिमेशनपटांना आवाज दिला आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगूसारख्या भाषांमध्येही हे अॅनिमेशनपट स्टुडिओकडून उपलब्ध करून दिले जात असल्याने प्रेक्षकवर्ग वाढला असल्याचे मत ‘सोनी पिक्चर्स इंडिया नेटवर्क’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कृष्णानी यांनी व्यक्त केले. हिंदी किंवा कोणत्याही भाषेत अॅनिमेशनपट डब करणे ही सोपी गोष्ट असते. तिथे लिप सिंक करावे लागत नसल्याने कोणत्याही पात्राच्या तोंडी जगभरातील कोणत्याही भाषेतील संवाद डब केले जाऊ शकतात. याचा परिणाम अनेक अॅनिमेशनपट भारतात विविध भाषेत डब होऊन येऊ लागले, अशी माहिती कृष्णानी यांनी दिली.
यंदा प्रदर्शित होणारे अॅनिमेशनपट
- ‘द सिक्रेट लाइफ ऑफ पेट्स’
- ‘आइस एज कोलिजन कोर्स’
- ‘सॉसेज पार्टी’
- ‘कुबो अॅण्ड द टु स्ट्रिंग्ज’
- ‘स्टॉर्कस’
- ‘मोआना’
- ‘सिंग’
