चित्रपटातील धूम्रपान आणि मद्यपानाच्या दृश्यांवेळी सावधानतेचा इशारा देणारा संदेश हटवण्यास कर्करोगाविरोधी लढय़ातील कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदेशांचा कलात्मक मांडणीला अडथळा येत असल्याने या संदेशांऐवजी चित्रपटाच्या आधी-नंतर विशेष माहितीपट तयार करून दाखवण्याचा चित्रपटकर्त्यांनी मांडलेला पर्याय फेटाळून लावण्यात आला आहे.
मुखाचा कर्करोग होत असलेल्या रुग्णांमध्ये तंबाखू खाण्याचे व्यसन अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे धुम्रपान, तंबाखू खाणे, गुटखा यांच्या उत्पादनावर व विक्रीवरही बंदी आणावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या व्यसनांच्या विळख्यात अडकून तरूण पिढीही भरकटत असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आणि सरकारने सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला. चित्रपटातील दृश्यांमुळे सिगारेट ओढण्यास किंवा दारू पिण्यास पाठबळ मिळत नाही, असा चित्रपटकर्त्यांचा दावा अमान्य करत धुम्रपान तसेच मद्यपानाच्या दृश्यांवेळीही हे पदार्थ घातक असल्याचा संदेश फिरवणे बंधनकारक केले. मात्र अशा संदेशांमुळे चित्रमांडणीत अडथळे येत असल्याचे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी चित्रपट सुरू होण्याआधी, मध्यंतरात किंवा संपल्यावर विशेष माहितीपट दाखवावे. ते माहितीपट बनवण्याची तयारीही निर्मात्यांनी दाखवली आहे. मात्र कर्करोगविरोधात लढा देत असलेल्या कार्यकर्त्यांना हे मान्य नाही. शाहरूख खान, अजय देवगण यासारखे स्टार कोटय़ावधी रुपये घेऊन पानमसाल्याच्या जाहिराती करतात. त्यांना पाहून इतरांनाही गुटखा खावासा वाटतो याची जाणीव जाहिरातदारांना असल्यानेच जाहिरातीवर खर्च होतात. मग चित्रपटात हेच कलाकार धुम्रपान, मद्यपान करत असल्याचे पाहिल्यावर करोडो तरुणांना तसे करावेसे वाटणार नाही असा दावा चित्रपटकर्ते कोणत्या मुद्दय़ावर करतात, असा प्रश्न टाटा स्मारक रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी केला आहे.