मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याच्या अर्जाला आपला विरोध असून तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी विशेष न्यायालयाकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज कारागृहातूनच विशेष न्यायालयाकडे केला होता. या अर्जावर न्यायालयाच्या आदेशानुसार, एनआयएने गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणाचा तसेच माने यांच्या माफीच्या साक्षीदार होण्याच्या अर्जाचा अभ्यास करण्यात आला. त्यात माने यांची प्रकरणातील भूमिका आणि पुराव्यांचा विचार करता त्यांची माफीचा साक्षीदार होण्याची मागणी मान्य करता येऊ शकत नाही, असे एनआयएने दोन पानी उत्तरात म्हटले आहे. शिवाय या दोन्ही प्रकरणांत माने याचा थेट सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यावरही भारतीय दंडसंहितेच्या कलम १२० ब नुसार फौजदारी कट रचणे, पुरावे नष्ट करण्याच्या मुख्य आरोपांसह बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आल्याचा दावाही एनआयएने माने यांच्या अर्जाला विरोध करताना केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antilia explosives scare case sunil mane actively involved in mansukh hiren murder case mumbai print news zws
First published on: 24-03-2023 at 03:43 IST