मुंबई : वित्त संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून २६ वर्षीय रिक्षाचालकाचे रिक्षासह अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मालाड येथे घडला. याप्रकरणी बांगुर नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेली रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली.

तक्रारदार संतोष महतो हे ओशिवरा येथे वास्तव्यास आहेत. मालाड लिंक रोड येथील इनऑरबिट मॉलजवळ त्यांना सोमवारी सायंकाळी चार व्यक्तींनी अडवले. आपण खासगी वित्त संस्थेतून आल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्या रिक्षाची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर तक्रारदारांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आरोपींपैकी दोन व्यक्तींनी महतो यांना जबरदस्ती रिक्षात बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना मारहाण केली. याप्रकरणी महतो यांच्या तक्रारीनंतर बांगुर नगर पोलिसांनी अपहरणासह चोरीचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी २४ तासांच्या आत पोलिसांनी चिराग सलीम शेख (३०), विजय रामअजय चौरसिया (४२), मोहम्मद अलीउद्दीन मोहम्मद रफीक शेख (२९) यांना अटक केली. तिनही आरोपी मालाड येथील रहिवासी आहेत. चोरीला गेलेली रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी वित्त संस्थेसाठी काम करत होते का याबाबत तपासणी करण्यात येत पोलिसांनी सांगितले.