अक्षय मांडवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरातन, ऐतिहासिक कलावस्तूंचा संग्रह असलेले मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ हे पश्चिम भारतातील सर्वोकृष्ट वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जाते. १९०५ साली वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर १९२२ साली सर रतनजी टाटा यांनी आपला खासगी संग्रह प्रशासनाला भेट म्हणून दिला. हा आजवरचा वस्तुसंग्रहालयातील सर्वात मोठा संग्रह आहे. यंदा सर रतन टाटा यांचे शंभरावे पुण्यतिथी वर्ष आहे. यानिमित्ताने त्यांना अभिवादन म्हणून वस्तुसंग्रहालय प्रशासनाने सर रतन टाटा यांनी दिलेल्या काही खास कलावस्तूंचा खजिना लोकांसमोर मांडला आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने..

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

‘प्रिन्स ऑफ वेल्स’ (नंतरचे किंग जार्ज पंचम) म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय उभारणीकरिता कारणीभूत ठरली ती खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स यांची ‘बॉम्बे’ भेट. या भेटीनिमित्त त्यांच्या नावे शहरात एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा विचार होता. त्यासाठी १४ ऑगस्ट १९०५ रोजी ‘टाऊन हॉल’मध्ये बैठक भरली होती. या बैठकीत ‘बॉम्बे’ बेटाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलणारे सर फिरोजशहा मेहता, नरोटादास गोकुळदास, जस्टिस चंदावरकर, ससून जे. डेव्हिड अशी सगळी मंडळी सहभागी झाली होती. त्यानंतर ११ नोव्हेंबर १९०५ साली प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते वस्तुसंग्रहालयाचा पायाभरणी समारंभ पार पडला. वस्तुसंग्रहालयाचे नाव ‘प्रिन्स ऑफ  वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया’ असे निश्चित करण्यात आले. १९०९ साली खुली स्पर्धा घेऊन इमारतीचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून जॉर्ज विटेट यांची निवड करण्यात आली. ‘इंडो-सॅरसनिक’ शैलीचे बांधकाम करण्यासाठी विटेट प्रसिद्ध होते. ‘इंडो-सॅरसनिक’ शैलीत हिंदू आणि इस्लामी वास्तुशैलींचा मिलाफ असून यात पश्चिमी वास्तुशैलींची तत्त्वेही आढळून येतात. वस्तुसंग्रहालयाची इमारत या शैलीचे उत्तम उदाहरण आहे. या इमारतीच्या वरच्या बाजूस असणाऱ्या भव्य गोलाकार घुमटाची प्रेरणा विटेट यांनी बिजापूर येथील गोल गुम्बद आणि आग्रा येथील ताजमहल येथून घेतली, तर नाशिक येथील जुन्या वाडय़ावरून प्रेरणा घेत लाकडी नक्षीदार कमानी त्यांनी येथे आणल्या.

अशाप्रकारे वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम १९१४ साली पूर्ण झाले. मात्र जनतेसाठी ते जानेवारी १९२२ रोजी खुले झाले. या मधल्या कालावधीत इमारतीचा वापर लष्करासाठी इस्पितळ आणि बालकल्याण केंद्र म्हणून करण्यात आला. त्यानंतर मात्र ‘बॉम्बे’च्या इतिहासात बरीच उलथापालथ झाली. ‘बॉम्बे’ बेट ‘मुंबई’ म्हणून ओळखू जाऊ लागले. कालांतराने या वस्तुसंग्रहालयाचे नामकरण झाले. प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनाचे निमित्ताने अस्तित्वात आलेल्या या संग्रहालयाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ म्हणून करण्यात आले. या बदलातही वस्तुसंग्रहालयाची बाग आणि आजूबाजूचा परिसर आपले सौंदर्य आणि आब टिकवून आहे.

वस्तुसंग्रहालयाच्या पायाभरणीपासूनच धनिकांनी आपल्याजवळील सर्वोत्तम संग्रह या वस्तुसंग्रहालयाला भेटस्वरूपी देण्यास सुरुवात केली. १९१५ साली संग्रहालयाने सेठ पुरुषोत्तम मावजी यांचा भारतीय लघुचित्रांचा तसेच कलावस्तूंचा संग्रह मिळवला. त्यापूर्वी हा संग्रह नाना फडणीस यांच्या कलासंग्रहाचा भाग होता. मिरपूरखास येथील बुद्ध स्तुपाच्या उत्खननातून मिळालेल्या वस्तू उत्खननकार हेन्री कूझेन्स

यांनी वस्तुसंग्रहालयाला दिल्या. सर रतन टाटा आणि सर दोराब टाटा यांचा कलासंग्रह अनुक्रमे १९२२ आणि १९३३ साली संग्रहालयाला भेट मिळाला. त्यानंतर १९३४ साली संग्रहालयाला सर अकबर हैदरी यांच्या संग्रहातील कला वस्तूंचा संग्रह मिळाला. आज वस्तुसंग्रहालयाकडे जवळपास ५० हजारांहून अधिक वस्तूंचा संग्रह आहे.

सर रतन टाटा यांनी दिलेला संग्रह हा वस्तुसंग्रहालयातील आजवरचा सर्वात मोठा खासगी कलावस्तूंचा संग्रह आहे. या संग्रहामध्ये प्रामुख्याने युरोपियन तैलचित्रे व कलावस्तू, जपानी आणि चिनी कलावस्तू यांचा समावेश आहे. तसेच भारतीय लघुचित्रे, शस्त्रास्त्रे, वस्त्रे आणि धातू मूर्तीचाही या संग्रहात आहेत. सर रतनजी टाटा यांचा जन्म १८७१ साली जमशेठ एन. टाटा यांच्या परिवारात झाला. सर रतनजी टाटा हे हुशार व्यावसायिक तर होतेच. मात्र त्याबरोबर त्यांना कला, पुरातत्त्वशास्त्र, विज्ञान, वास्तुशास्त्र, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विषयांची आवड होती. त्यांना परदेश भ्रमंतीची आवडही असल्याने त्या-त्या प्रदेशात गेल्यावर तेथील उत्तम कलावस्तू सर रतनजी टाटा विकत घेत. लंडन येथील ‘यॉर्क हाऊस’ टाटा यांनी १९०६ साली विकत घेतले. या ठिकाणी त्यांनी आपल्या खासगी प्रदर्शनाचे जतन केले. त्यानंतर जहाजातून भारतात परतत असताना जहाजाचा अपघात झाला. त्यातून टाटा बचावले. मात्र पुन्हा लंडनला परतल्यावर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेरीस ५ सप्टेंबर १९१८ साली त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपत्रात त्यांनी आपला संग्रह मुंबईतील वस्तुसंग्रहालयाला भेटस्वरूपी देण्याची इच्छा व्यक्त  केली होती. तसेच मुंबईतील घरामध्ये असणाऱ्या संग्रहातील काही वस्तू संग्रहालयाला देण्याचा निर्णय आपली पत्नी लेडी नवाजबाई यांच्याकडे सोपविला होता. सर रतनजी टाटा यांच्या इच्छेनुसार १९२२ साली लंडन येथील सर्व कलावस्तू भारतात हलवून त्या संग्रहालयाला भेटस्वरूपी देण्यात आल्या, तर मुंबईतील काही वस्तूंचा यामध्ये समावेश होता. तेव्हापासून यामधील निवडक वस्तूंचा संग्रह वस्तुसंग्रहालयामध्ये मांडण्यात आला. तर काही वस्तू या जतन करून ठेवण्याच्या उद्देशाने प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या नाहीत.

यंदा सर रतनजी टाटा यांचे शंभरावे पुण्यतिथी वर्ष असल्याने त्यांनी दिलेल्या काही खास वस्तूंचे प्रदर्शन वस्तुसंग्रहालयाने भरवले आहे. वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन मांडण्यात आले असून ७ ऑक्टोबपर्यंत ते खुले राहणार आहे. यात क्वचितच प्रदर्शनात मांडलेल्या काही वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. १९व्या शतकात धार्मिक वस्तूंचा संग्रह करण्यात कोणी फारसा रस घेत नसल्याने सर रतन टाटा यांनी नेपाळ आणि तिबेट या भागांतील धार्मिक वस्तूंचा संग्रह केला. हा संग्रह या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. यामध्ये कपडय़ांवर बनविलेली चित्रे आणि सोन्याचा मुलामा असलेली हिंदू देवतांसह बुद्ध मूर्तीचाही समावेश आहे. शिवाय जपानी आणि चीन कला या सत्रात चीन मातीची भांडी, लाखपासून बनविलेल्या वस्तू, हस्तिदंताच्या वस्तू आणि लाकडी कलाकुसरींच्या वस्तू आहेत. शिवाय युरोपीय कलाक्षेत्रातील सर रतन टाटा यांनी संग्रहित केलेली उत्कृष्ट तैलचित्रे या ठिकाणी मांडण्यात आली आहेत.

akshay.mandavkar@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about chhatrapati shivaji maharaj museum
First published on: 19-09-2018 at 03:47 IST