कोळी वाडी, गिरगाव

मुंबईहून ठाण्यासाठी पहिली रेल्वेगाडी सुरू झाली आणि त्यापाठोपाठ या शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. रोजगाराच्या शोधात मुंबईत आलेल्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या धुरिणांनी, तसेच व्यापारामध्ये यश मिळविलेल्या काही व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने, तसेच कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत चाळी उभारायला सुरुवात केली.  गिरगावच्या फणसवाडीतील कोळी वाडी त्यापैकीच एक.

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Fraud by Ramdev Baba patanjali group by taking the land of farmers at cheap price
रामदेवबाबांकडून शेतकऱ्यांची जमीन स्वस्त दरात घेऊन फसवणूक! पतंजलीचे फूड, हर्बल पार्क कधी होणार?
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

रायगड जिल्ह्य़ातील नौपाडा गावातील बाळकृष्ण भिवाजी तानाजी नाकवा पाटील एक हरहुन्नरी कोळी होते. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. मासेमारीच्या व्यवसायात मुरलेल्या बाळकृष्ण यांनी मुंबई बंदर हेरले आणि मुंबई बेटावर एखादी जागा घेण्याचा बेत त्यांनी पक्का करून टाकला. दरम्यानच्या काळात मुंबई बेट कात टाकत होते. बाळकृष्ण यांनी आताच्या गिरगाव परिसरात एक भूखंड ९९ वर्षांच्या भाडेपट्टय़ाने घेतला आणि त्यावर चाळ उभी केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी १३ चाळी उभ्या केल्या. काही दुमजली, काही तीन मजली अशा १३ इमारती मुंबईत रोजगाराच्या शोधात आलेल्या तरुणांच्या बिऱ्हाडांनी गजबजून गेल्या. दरम्यानच्या काळात बाळकृष्ण भिवाजी तानाजी नाकवा पाटील यांचे कुटुंब राऊत नावाने प्रसिद्ध झाले. या चाळींमध्ये राऊतांचा बंगला आजही मोठय़ा दिमाखात उभा आहे. आजघडीला कोकण, विदर्भ, सातारा आणि आसपासच्या परिसरातून मुंबईत आलेली तब्बल ५२२ बिऱ्हाडे कोळी वाडीत मुक्कामी आहेत. बाळकृष्ण यांचे पुत्र भाऊसाहेब मोठे हिकमती होते. ब्रिटिशांच्या  गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळी उभ्या राहात होत्या. महात्मा गांधींच्या विचाराने अनेक तरुण भारावून जात होते. भाऊसाहेबांनाही महात्मा गांधींच्या विचारांची ओढ लागली. भारतामध्ये ब्रिटिशांविरोधात वातावरण तापू लागले होते. मुंबईतही त्याचे पडसाद उमटत होते. ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी अनेक ठिकाणी गुप्त बैठका होत होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झपाटलेले काही तरुण मुंबईत कार्यरत होते. त्यापैकीच एक भाऊसाहेब राऊत. त्या काळी राऊतांचा बंगला म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचे एक केंद्र बनले होते. बाहेरगावाहून येणारे अनेक सत्याग्रही राऊतांकडे उतरायचे. पण या कानाचे त्या कानाला कळायचे नाही. कोळी वाडीत प्रवेश करण्यासाठी आठ ते दहा रस्ते होते. ब्रिटिश पोलिसांची धाड पडताच राऊतांच्या बंगल्यात उतरलेले सत्याग्राही तात्काळ पळून जायचे. या प्रवेशद्वारांवर लोखंडी दरवाजेही बसविण्यात आले होते. केवळ ब्रिटिश पोलिसांना रोखण्यासाठीचा त्यांचा वापर होत होता. भाऊसाहेबांच्या प्रेरणेचे या चाळीतील काही तरुण स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. कोळी वाडीतील रहिवासी राजेश्वर बऱ्हानपुरे यांनी विद्यापीठात जाऊन भारताचा तिरंगा फडकविला आणि त्याच क्षणी ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबारही केला. मात्र सुदैवाने ते बचावले. भाऊसाहेबांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे कोळी वाडीमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा राबता होता. सरहद्द गांधी अब्दुल गफार खान, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, सरोजिनी नायडू, क्रांतिसिंह नाना पाटील, तारा रेड्डी, साने गुरुजी अशा अनेक प्रभूतींनी कोळी वाडीमध्ये उपस्थिती लावली होती. गांधी चौकामध्ये होणाऱ्या सभांमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असे. त्यामुळे कोळी वाडी ब्रिटिशांना डोकेदुखी बनली होती. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि अवघ्या भारतवर्षांत जल्लोश साजरा झाला. कोळी वाडीमध्ये तर स्वातंत्र्याचा उत्सवच साजरा झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेब राजकारण आणि समाजकारणात व्यस्त झाले. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत भाऊसाहेब विजयी झाले आणि खासदार म्हणून संसदेत दाखल झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी महाराष्ट्रापासूून मुंबई तोडण्याचा घाट केंद्रातील सरकारने घातला होता. त्यावेळी मुंबईमधील अनेक प्रतिष्ठित आणि कष्टकरी मंडळी रस्त्यावर उतरली. भाऊसाहेब आणि कोळी वाडीतील रहिवाशीही हिरिरीने या चळवळीत उतरले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ामध्ये कोळी वाडी केंद्रस्थान बनली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ामध्ये अग्रणी नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, राम जोशी, आप्पा पेंडसे, लालजी पेंडसे अशा अनेक दिग्गज मंडळींचा कोळी वाडीमध्ये राबता होता. लढय़ाची दिशा ठरविण्यासाठी अनेक बैठका भाऊसाहेबांच्या बंगल्यात होत होत्या. त्यामुळे कोळी वाडीतील काही तरुण आपसूकच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात सहभागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन भागात अनेक सत्याग्रही जमले होते. कोळी वाडीतील सिताराम बाणाजी पवार हा १६ वर्षांचा मुलगाही त्यात होता. पोलीस लाठीहल्ला करू लागले तेव्हा सीताराम प्रचंड संतापला. त्याने एका पोलीस निरीक्षकाला पाठीमागून घट्ट धरून ठेवले. हा प्रकार पाहून अन्य एका पोलिसाने सीतारामच्या दिशेने बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात सीताराम शहीद झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील हा पहिला हुतात्मा. त्या दिवशी कोळी वाडी सुन्न झाली होती. पण सीतारामच्या हौतात्म्याने ठिणगी पडली आणि केवळ कोळी वाडीतीलच नव्हे तर अवघ्या मुंबईतील तरुण मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि लढा अधिकच तीव्र होत गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे महाराष्ट्राला मुंबई मिळाली. पण दुर्दैवाने कालौघात सीतारामच्या बलिदानाचा विसर पडला. ही गोष्ट कोळी वाडीतील प्रभाकर वर्तक, अनंत मेस्त्री, श्रीहरी इंगळे, दत्ता गुरव, दादा एकबोटे यांच्यासह अनेकांना अस्वस्थ करीत होती. अखेर या मंडळींनी कोळी वाडी परिसरात सीतारामचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आणि शासनदरबारी अनेक वेळा खेटे घातले. सर्व सोपस्कार पूर्ण करून अखेर सीतारामचे छोटेसे स्मारक कोळी वाडीच्या बाहेर उभे राहिले.

मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्यानंतर एकदा कोळी वाडीमध्ये दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरेही उपस्थित होते. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी संघटना स्थापन करण्याचा मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला आणि शिवसेनेच्या स्थापनेची कल्पना या चर्चेतून पुढे आली. त्यामुळे शिवसेना आणि कोळी वाडी यांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले आणि रहिवाशांनीही ते जपले. केवळ स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी यांच्याशीच भाऊसाहेबांचे घनिष्ट संबंध नव्हते. तर अधूनमधून गाडगे महाराजही भाऊसाहेबांकडे येत असत. शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी भाऊसाहेब एक होते. भाऊसाहेबांच्या व्यासंगामुळे कोळी वाडीला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते. केवळ भाऊसाहेबच नव्हे तर प्रख्यात मूर्तिकार शंकरराव भिसळे, विविध वाद्यांची निर्मिती करणारे जयसिंग भोई, कलावंत हिराकांत गव्हाणकर, प्रभाकर पणशीकर, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, रंगभूषाकार बाबा वर्दम आदी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविऱ्या मंडळीच्या वास्तव्याने कोळी वाडीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. चळवळींशी अतूट नाते असलेले कोळी वाडीतील रहिवाशी उत्सवप्रेमी, गोपाळकाला, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा संकल्प कोळी वाडीने सोडला होता. गोपाळकाल्याच्या दिवशी पौराणिक आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे चित्ररथ साकारून कोळी वाडीतील रहिवाशांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम अनेक वेळा चोखपणे बजावले. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक घडामोडींमध्ये कोळी वाडीने मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच कोळी वाडीला इतिहासाची साक्षीदार म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही.

prasadraokar@gmail.com