‘कलात्मक कोल्हापुरी’ नावाने चपलांचे विपणन; राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम

चालताना येणाऱ्या ‘करकर’ आवाजाने सर्वाचे लक्ष वेधून घेणारी ‘कोल्हापुरी चप्पल’ आता लवकरच नवा आंतरराष्ट्रीय साज लेवून बाजारपेठेत दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला असून ‘कलात्मक कोल्हापुरी’ या नावाने त्याचे विपणन केले जाणार आहे.

कोल्हापूर येथील स्थानिक कारागीरांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार असून पॅरिस येथील पादत्राणांच्या प्रख्यात डिझायनर नेओना स्काने कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरी चपलेचा मूळ साज आणि पारंपरिकता कायम ठेवून तिला हे  नवे रुप दिले जाणार असून ‘नक्षत्र कलेक्शन’ अंतर्गत या कोल्हापुरी चपलेची विक्री, विपणन केले जाणार आहे.

या उपक्रमात ‘बाटा’ आणि अन्य पादत्राणे उत्पादन कंपन्यांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या उपक्रमातून कोल्हापुरी चप्पलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळवून देण्याचा खादी आणि ग्रामोद्योग विकास मंडळाचा प्रयत्न आहे. कोल्हापुरी चप्पलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला जात आहे. त्यासाठी परदेशातील आणि भारतातील पादत्राणे कंपन्या एकत्रपणे काम करणार आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शनही घेण्यात येणार आहे. कोल्हापुरी चप्पलेचा मूळ बाज कायम ठेवून तिला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवे रुप देण्याचा आणि त्याचे विपणन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग विकास मडंळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांनी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत पॅरिस येथील नेओना स्काने या कोल्हापूर येथील स्थानिक बाजारपेठेतील कोल्हापुरी चप्पल विक्रेते, उत्पादकांशी चर्चा करणार आहेत. कोल्हापुरी चप्पलेचा मूळ बाज, कला कायम ठेवून त्यांना नवे रुप देण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्यांनी एक कार्यशाळा कोल्हापूर येथे घेतली होती आता डिसेंबर महिन्यात पुढील कार्यशाळा होणार असल्याची माहितीही बागला यांनी दिली.

कोल्हापूर येथील कोल्हापुरी चप्पल तयार करण्याच्या स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल सुमारे नऊ कोटी रुपयांची आहे. कोल्हापुरी चप्पल आपले वैशिष्ठय़ आजही टिकवून असली तरी बदलत्या काळानुसार या चपलांना देशाच्या अन्य राज्यातून विशेषत: कर्नाटक राज्यातून येणाऱ्या चपलांचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या स्थानिक कारागिरांना नवे तंत्रज्ञान शिकविणे, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे या कोल्हापुरी चप्पल तयार करणे आणि तरुण पिढीला या चप्पलांतडे मोठय़ा प्रमाणात आकृष्ट करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बुचडे यांनी सांगितले.

  • सुमारे पंधरा कोटीचा व्यवसाय
  • चार हजार चर्मोद्योग कारागीर
  • कोल्हापुरातील एकूण चप्पल विक्रेते १५०
  • व्यावसायिकांच्या प्रमुख मागण्या
  • या व्यवसायाला संधी निर्माण करून देण्यासाठी स्वतंत्र क्लस्टर करावे.
  • जीएसटीमधूनही हा व्यवसाय वगळावा.
  • उद्योगासाठी पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे.
  • शासनाने कच्चा माल उपलब्ध करून द्यावा.
  • कारागिरांच्या मागण्या- साठ वर्षांवरील कारागिरांना पेन्शन द्यावी.