मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे श्रीमंतांकडून पैसे उकळण्यासाठी खोटी प्रकरणे दाखल करीत असल्याचे आर्यन खान प्रकरणातील पंच साक्षीदाराच्या आरोपातून उघड झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी विशेष चौकशी पथक (एसआयटी)  नेमून चौकशी करण्याची मागणी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही चौकशीची मागणी के ली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांची नावे जाहीर केली होती. त्यात प्रभाकर साईल यांचे नाव पहिले होते. आता पंचांनीच या प्रकरणातील वस्तुस्थिती उघड केली आहे. त्यांचे आरोप गंभीर असून राज्य सरकारने याची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

आरोप गंभीर – नाना पटोले

आर्यन खानप्रकरणी नव्या पुराव्यांमुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला सोडविण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली.

चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काहींनी सुपारी घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेले प्रतिपादन खरे असल्याचेच पंच साक्षीदाराच्या आरोपातून सिद्ध झाले, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले.

चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करण्याचा एनसीबीचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी केली.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर जयंत पाटील

ठाणे : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम सुरू झाले आहे. हे आर्यन खानच्या प्रकरणात झालेल्या पैशांच्या मागणीवरून स्पष्ट होत आहे, असा आरोप जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने रविवारी  जयंत पाटील ठाण्यात आले होते. आर्यन खान प्रकरणात पैसे मागितले गेले असेल तर हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकारे जर पैशांची मागणी कोण करत असेल तर यामध्ये बरेच लोक असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने  विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा लावण्याची प्रथा सुरू केली आहे, असाही आरोप पाटील यांनी केला.

पाणी समस्येवर आज बैठक

राज्यात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे धरणे अपुरे पडत आहे. पाण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात अभियंत्यांची बैठक सोमवारी बोलावण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पाणी समस्येवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan case nawab malik demand for inquiry into allegations against ncb zws
First published on: 25-10-2021 at 03:18 IST