‘एमआयएम’चे असोदुद्दीन ओवेसी यांचा टोला

मुंबई : आजवर ‘मातोश्री’तून रिमोटद्वारे सत्ता चालविणाऱ्या ठाकरे यांचा रिमोट आता निकामी झाला आहे. रिमोट चालत नसल्यानेच ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा टोला ‘एमआयएम’चे अध्यक्ष असोदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी येथे मारला.

केंद्र सरकारचा राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी कायदा घटनाविरोधी असून त्याला विरोध करण्याची घोषणाही ओवेसी यांनी यावेळी केली. विधानसभा निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ने राज्यात ५२ उमेदवार रिंगणात उतरवले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलेल्या ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना २०१४च्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी  प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात दोन जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पक्षाला चांगले यश मिळत आहे. मात्र यावर आपण समाधानी नसून विधानसभा निवडणुकीत ५२ जागांवर उमेदवार उभे करताना धनगर, वंजारी, मातंग, धोबी, ख्रिस्ती अशा सर्वच जाती-धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर निवडणुकीत चर्चा होऊन सरकारचे अपयश उजेडात येऊ नये यासाठीच या निवडणुकीचा प्रचार ३७० कलमाभोवती फिरविण्याची सेना-भाजपची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबरची युती दुर्दैवाने तुटल्याचेही त्यांनी सांगितले.