मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात बोलतांना राज्याला मंदिरांची गरज आहे का आरोग्य मंदिरांची गरज आहे? असा प्रश्न केला होता. दरम्यान यावर राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवत आहेत. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का, याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?” असे देखील शेलार म्हणाले.

हेही वाचा – “महाराष्ट्र भाजपाने फक्त एवढंच स्पष्ट करावं की….”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

शेलार यांनी ठाकरे सरकारवर आरोप करत काही प्रश्न केले आहेत. “पब, रेस्टाँरंट, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केली, कामगारांच कारण सांगून मॉल उघडलेत मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल करोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणाऱ्याचे पोट भरु शकत नाही का?”

“मुख्यमंत्री आरोग्य केंद्राबाबत बोलतात तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आरोग्य केंद्रे? कुठे आहेत पायाभुत सुविधा? महानगरपालिकेच्या रुग्णालयात डोळा कुरतडून खाल्ला म्हणुन मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजूला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटरमध्ये टॉयलेट मधे मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू, थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवावी”, असे शेलार म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar accuses thackeray government health centers cm uddhav thackeray srk
First published on: 08-09-2021 at 19:05 IST