चंद्रपूर : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम शून्य किलोमीटर होते. मात्र, आता ४७४ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले. जिल्ह्यातील अनेक मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या कक्षेत आणून विकासाची गाडी वेगात धावू लागली आहे. १० हजार कोटींची विकासकामे जिल्ह्यात केली. मतदारांनी जाती-धर्माच्या राजकारणात अडकून न पडता भविष्यात या भागात मोठे उद्योग उभे राहणार असल्याने विकासाभिमुख उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीला पाठवावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शिवाजी महाविद्यालय प्रांगणात जाहीरसभेत गडकरी बोलत होते. मंचावर वनमंत्री तथा महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार, माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…
जिल्ह्यातील पाण्याचा जलसाठा आणि सिंचनाची सुविधा वाढविण्यासाठी तलाव खोलीकरण केले, गावातले पाणी गावात, शेतातील पाणी शेतात आणि घरातील पाणी घरात असे सूक्ष्म नियोजन करून शेतकरी समृद्ध व संपन्न करण्याची योजना आखली. १६ लाख कोटी रुपयांचे डिझेल-पेट्रोल आयात करणे थांबवून स्थानिक शेतकरी व बेरोजगारांच्या हाताला काम देऊन सीएनजी, बायोगॅस, मिथेनॉल, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती केली. या भागात पुढे मोठे उद्योग उभे राहणार असून याकरिता मुनगंटीवार यांना निवडून देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. मुनगंटीवार राज्यात विकासपुरुष नावाने परिचित झाले. आता लोकसभेत दिल्लीला पाठवून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यात पहिल्या क्रमांकावर नेतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
देशात पन्नास लाख कोटी रुपयांचे विकासकार्य माझ्या हातून घडले. रस्ते, पूल मोठ्या प्रमाणात तयार करून देशातील वाहतुकीचे अंतर व लागणाऱ्या वेळेत आमूलाग्र बदल केला. चंद्रपूर जिल्ह्याचा विकास करायचा असतील तर मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठविणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.
हेही वाचा…गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
शरद जोशी व ॲड. चटप यांच्या कार्याचा गौरव
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे विचार स्पृहनिय होते, त्यांच्याच विचारांचे आपण असून शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाचा व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख गडकरी यांनी यावेळी केला.