scorecardresearch

‘साई बाबांच्या मंदिरात अतुलने मला वचन दिले’, वास्तूतज्ञ आनंद पिंपळकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावले यांनी पहिल्यांदाच साई बाबांवरील गाणे गायले आहे.

Atul promised sing sai baba song Anand Pimpalkar
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावले यांनी पहिल्यांदाच साई बाबांवरील गाणे गायले आहे. ‘तुमच्या आगामी चित्रपटात आमचे गाणे असेलच, असे वचन अतुल गोगावलेने मला साई बाबांच्या मंदिरात दिले होते आणि ते वचन पूर्ण केले. अजय गोगावलेच्या भारदस्त आवाजात ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटातील ‘ओम साई राम’ हे गाणे ध्वनिमुद्रीत करण्यात आले’, असे वास्तूतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी सांगितले.

आनंद पिंपळकर यांची पहिली निर्मिती असलेल्या ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाची नुकतीच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यावेळी ते बोलत होते. संगीतकार अजय-अतुल यांचे नाव आले म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि अजय गोगावलेच्या आवाजात गायलेली गाणी आपोआपच ऐकू येतात. मग उडत्या चालीचे ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाणे असो किंवा मग ‘माऊली’ चित्रपटातील विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे ‘माऊली माऊली’. सर्व प्रकारची गाणी अजय-अतुल यांनी आजवर श्रोत्यांना दिली आहेत.

हेही वाचा >>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले “अजित पवार, सुप्रिया सुळे…”

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद पिंपळकर यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. बारा राशींच्या बारा तऱ्हेच्या नमुन्यांची गोष्ट पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटातून बारा कलाकारांच्या अभिनयातून मांडली जाणार आहे. आनंद पिंपळकर यांच्या या पहिल्या चित्रपटाच्या प्रयत्नात संगीताच्या साथीने अजय गोगावले यांनी ‘ओम साई राम’ हे गाणे गायले आहे. आजवर अनेक देवांच्या आरत्या, गाणी अजय-अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केल्या आहेत आणि अजयने गायल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच साई बाबांवरील गाणे अजय गोगावलेच्या आवाजात श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 15:17 IST