मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या – चांदीच्या मौल्यवान वस्तूंचा गुरुवार म्हणजेच आज लिलाव होणार आहे. सायंकाळी ५ पासून लिलाव प्रक्रिया सुरू होईल. काही महागडे दागिने आणि सोन्याच्या नाणी आदींचा लिलाव करण्यात येणार आहे. मुंबईकरांसह संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मुंबईत येत असतात.तासन् तास रांगेत उभे राहून गणपतीचे दर्शन घेतात. तसेच लालबागच्या चरणी विविध वस्तू अर्पण केल्या जातात. गतवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दानपेटीतून ४८ लाखाहून अधिक रक्कम जमा झाली होती. तसेच, दहा दिवसांच्या कालावधीत जवळपास आठ कोटी रुपये दानपेटीत जमा झाले होते. यंदा देखील कोट्यवधी रुपये लालबागच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. तसेच अनेक भाविकांकडून गणपतीच्या चरणी सोने, चांदी, मौल्यवान वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत. त्यात चांदीचे मोदक, समई, सोन्याच्या अंगठ्या, चांदीची भांडी, अन्य दागिने, सोन्या – चांदीची नाणी, पेन आदी विविध वस्तूंचा समावेश आहे. भाविकांनी गणपतीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा गुरुवारी म्हणजेच आज लिलाव होणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत लालबाग मार्केटमधील लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर वस्तूंचा लिलाव होणार आहे.
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या दिवसांत भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंची विक्री करून मंडळाला किमान ७० लाखाहून अधिक रुपये मिळाले होते. लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम सामाजिक उपक्रम, शिक्षण, आरोग्यसेवा, तसेच विविध सेवाभावी कामांसाठी खर्च करण्यात येते. मंडळाने मागील काही वर्षांत रुग्णालयांना उपकरणे देणे, शैक्षणिक मदत करणे आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे.