एका गाडीचे २२ दरवाजे स्वयंचलित करण्याचा प्रस्ताव

दरवाजात लटकून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुंबईकरांच्या जिवाची काळजी करत पश्चिम रेल्वेने आता स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका गाडीचे २२ दरवाजे, म्हणजेच साधारण पाच डबे स्वयंचलित करण्यात येणार आहेत. गेल्या वेळी हा प्रयोग फसला असला, तरी या वेळी पूर्णपणे स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान वापरल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता पश्चिम रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. या २२ स्वयंचलित दरवाजांसाठी १.३ कोटी रुपयांचा निधी लागणार असून याबाबतचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेवरील एका गाडीच्या महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातील दोन दरवाजे स्वयंचलित करण्यात आले होते. मात्र हे दरवाजे पूर्णपणे स्वयंचलित नसून त्यांचे नियंत्रण मोटरमनकडे होते. त्यामुळे स्थानक आल्यानंतर मोटरमनने कळ दाबल्याशिवाय हे दरवाजे उघडत नव्हते. परिणामी दार उघडण्यासाठी वेळ लागायचा. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म आलेल्या बाजूचे दार उघडण्याऐवजी दुसऱ्या बाजूचे दार उघडण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या होत्या. त्यामुळे महिला प्रवाशांनी स्वयंचलित दरवाजांच्या या प्रयोगाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

मात्र आता पश्चिम रेल्वेने २२ दरवाजे स्वयंचलित करण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. हे दरवाजे पूर्णपणे स्वयंचलित असतील. त्यांचे कोणतेही नियंत्रण मोटरमनकडे नसेल. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत आतून हे दरवाजे उघडण्यासाठीची सोय डब्यांमध्ये करून दिली असेल. पूर्णपणे स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे स्थानक आल्यानंतर हे दरवाजे आपोआप उघडतील, असे भाकर यांनी स्पष्ट केले. या २२ दरवाजांसाठी १.३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यावर लगेचच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही भाकर यांनी सांगितले.