scorecardresearch

एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारातील वाहन तपासणी केंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत; राज्य शासनाकडे सादर

परिवहन विभागाने नाशिकमधील पंचवटी परिसरात ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारले.

एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारातील वाहन तपासणी केंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत; राज्य शासनाकडे सादर
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई: वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी यासाठी परिवहन विभागाने राज्यात स्वयंचालित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून मुंबईमधील एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगारात हे केंद्र उभारण्यात येणार होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून चर्चेत असलेले स्वयंचालित वाहन तपासणी केंद्र रखडले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी निविदा मागविण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी करण्यात येते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करतानाही तपासणी होते. त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. ब्रेक, प्रदुषण, वाहनांचे सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाइट इत्यादींची तपासणी करण्यात येते. मात्र कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वाहन तपासणीस बराच वेळ लागतो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही.

हेही वाचा >>> ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रकल्पाच्या महारेरा नोंदणीचा मार्ग मोकळा; विकासक आणि ग्राहकांना मोठा दिलासा

परिवहन विभागाने नाशिकमधील पंचवटी परिसरात ऑक्टोबर २०१५ मध्ये स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारले. मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची बारकाईने तपासणी करण्यासाठी स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक यासह अन्य मोठी यंत्रणा उभारण्यात आली. एसटी महामंडळाने अशाच प्रकारची यंत्रणा कुर्ला नेहरू नगर आगारातही उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र हे काम अद्यापही पुढे सरकू शकलेले नाही. या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. कामाचे आदेश काढणे बाकी असून त्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळावी यासाठी काही महिन्यापूर्वी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यापूर्वी निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात बदल सुचवण्यात आल्यानंतर प्रस्ताव शासनाने पुन्हा एसटी महामंडळाकडे पाठवला. यात बदल करून पुन्हा निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती एसटी महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या  प्रस्तावाला मंजुरी मिळताच काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या केंद्राच्या उभारणीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून निधी मिळणार आहे.

हेही वाचा >>> गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात अडथळा ठरणारी ५५ अनधिकृत बांधकामे तोडली; मुंबई महानगरपालिकेची भांडुपमध्ये मोठी कारवाई

कुर्ला आगाराचा परिसर खूपच मोठा असून सध्या तेथे एसटी गाड्यांच्या परिचालनाशिवाय अन्य कामे होत नाहीत. स्वयंचलित केंद्र उभे राहिल्यास दिवसाला जवळपास २०० हून अधिक वाहनांची तपासणी करता येईल. मंजुरी मिळताच वर्षभरात हे केंद्र उभारण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथेही वाहन तपासणी केंद्रे उभारणार

मुंबईतील कुर्ला नेहरू नगर आगाराबरोबरच ताडदेव, ठाण्यातील मर्फी, कल्याणमधील नांदिवली, पनवेलमधील तळोजा, नागपूरमधील हिंगणा, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पुण्यातील दिवे घाट, तर कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती येथेही स्वयंचालित वाहन तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 22:00 IST

संबंधित बातम्या